Sat, Sep 21, 2019 06:37होमपेज › Konkan › दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा धुडगूस सुरुच

दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा धुडगूस सुरुच

Published On: May 15 2019 1:52AM | Last Updated: May 14 2019 10:26PM
साटेली-भेडशी : वार्ताहर

घोटगेवाडी येथे सोमवारी संध्याकाळी टस्कर हत्तींने गावच्या उपसरपंचासह अनेक शेतकर्‍यांचा थरारक पाठलाग करुन व तेथील माड तसेच अन्य शेतीचे नुकसान करुन घोटगे गावाकडे मोर्चा वळविला. वन अधिकारी व घोटग ग्रामस्थांनी  हत्ती हटाव मोहीम सुरू केली असता या टस्कराने आपला मार्ग बदलून मोर्लेच्या दिशेने कूच केली. या टस्कराबरोबर मोर्ले येथे आणखी तीन हत्ती दाखल होऊन येथील शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले.  

मोर्ले येथील गणपत मोर्ये, सरस्वती मसुरकर, भगवान गवस, मधुकर बांदेकर यांचे माड व सुपारी जमीनदोस्त करुन लाखो रुपयांचे नुकसान केले. याची  माहिती वनविभागाला मिळताच वनरक्षकांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.  मोर्ले येथून पारगड येथे जाण्यासाठी रस्ता काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. याठिकाणी मोर्ले येथील रहिवासी महेश चिरमुरे हे कामावर असतात. मंगळवारी सकाळी ते कामावर जात असताना त्यांनी एक हत्ती व छोटी दोन पिल्ले जाताना पाहिले. त्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. आता दिवसा ढवळ्या हत्तींचा वावर सुरू असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाकडून हत्तींनी केलेल्या नुकसानीचे केवळ पंचनामे केले जातात व शेतकर्‍यांना तुटपुंजी भरपाई दिली जाते. परंतु  यावर कायमस्वरुपी उपाययोजना होत नसल्याने शेतजकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे. शेतीची नुकसान भरपाई देता येईल पण एखाद्या माणसाचा जीव गेला तर त्याची भरपाई कशी देणार? असा प्रश्‍न आता शेतकर्‍यांकडून विचारला जात आहे. हे हत्ती अनेकवेळा शेतकर्‍यांच्या जीवावर बेतले आहेत. 2017 साली हेवाळे येथील चंद्रकांत गवस यांचा दिवसाढवळ्या असाच पाठलाग करण्यात आला होता. तर काही दिवसापूर्वी एका महिलेवर हल्ला करण्यात आला होता. सोमवारी घोटगेवाडी  उपसरपंचासह अनेक शेतकर्‍यांचा पाठलाग करण्यात आला. असेच होत असेल तर दिवसाढवळ्या फिरायचे तरी कसे? शेतात जायचे तरी कसे?असे  सवाल शेतकरी व ग्रामस्थांचा आहे. 

हत्ती पकड मोहीमच आवश्यक 

हत्तींना प्रतिबंध करण्यासाठी मधुमक्षिका पेट्या,सौरऊर्जेचे कुंपण असे अनेक उपाययोजना करण्यात आल्या, परंतु त्या अयशस्वी ठरल्या, त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणजे हत्ती पकड मोहीम राबविणे गरजेचे आहे. ही मोहीम राबवून हत्तींचा कायम स्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्‍यांकडून जोर धरत आहे.