Mon, Sep 16, 2019 11:56होमपेज › Konkan › आघाडीच्या मनोमिलनाला २९ चा मुहूर्त 

आघाडीच्या मनोमिलनाला २९ चा मुहूर्त 

Published On: Mar 27 2019 1:52AM | Last Updated: Mar 27 2019 1:52AM
चिपळूण : खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीच्या मनोमिलनाला मुहूर्त मिळाला असून येत्या 29 मार्च रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांची संयुक्‍त बैठक होणार आहे. यावेळी आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादीची केंद्रस्तरावर आघाडी झाली. दुसर्‍या बाजूला सेना व भाजपची युती झाली. मात्र, जिल्ह्यातील युती किंवा आघाडीबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. दोन्हीकडील पदाधिकारी अजूनही स्वतंत्रपणे प्रचार बैठका घेत आहेत. युतीचा विचार केल्यास अद्याप शिवसेना-भाजप युतीचा एकत्रित प्रचाराचा नारळ जिल्ह्यात फुटलेला नाही. युतीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांनी चिपळूणसह जिल्हाभरात शिवसेना कार्यकर्त्यांचे स्वतंत्र मेळावे घेतले. 

चिपळूणमध्ये शहर व तालुक्याच शिवसेनेचा मेळावा झाला. मात्र, हे मेळावे शिवसेनेच्या बॅनरखाली घेण्यात आले. त्यामुळे अद्याप जिल्ह्यातील शिवसेना, भाजप कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर आलेले नाहीत.  दुसर्‍या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षांची आघाडीसुद्धा जिल्ह्यात अद्याप घोषणाच ठरली आहे. काँग्रेसनेदेखील अद्याप स्वतंत्रपणे प्रचार सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. आघाडीचे पदाधिकारीही अजून एकदाही एकत्रित व्यासपीठावर आलेले नाहीत. त्यामुळे युती किंवा आघाडीच्या पदाधिकार्‍यांबाबत अजूनही मनोमीलन झालेले नाही. 
याआधी झालेल्या नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत देखील चौरंगी लढती झाल्या. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा चारही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढविल्या. त्यानंतर गेली काही वर्षे परस्परांवर टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप झाले. यामुळे युती किंवा आघाडीतील घटक पक्ष काहीसे दुरावलेलेच आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आघाडी किंवा युती झाली असली तरी जिल्ह्यातील पदाधिकारी मात्र एकत्र आलेले नाहीत.  येथील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात 29 रोजी आघाडीची बैठक होणार असून यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षातील आघाडीचा सूर स्पष्ट होणार आहे. 

राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिसर्‍या टप्प्यात मतदान होत आहे. शिमगोत्सवानंतर जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उडणार असून या ठिकाणी युतीचे खा. विनायक राऊत, काँग्रेस आघाडीचे नवीनचंद्र बांदिवडेकर, स्वाभिमानचे नीलेश राणे, वंचित बहुजन आघाडीचे काका जोशी असे चार उमेदवार घोषीत झाले आहेत. तर रायगड लोकसभा मतदारसंघात आघाडीचे सुनील तटकरे विरुद्ध सेनेचे अनंत गीते यांच्यात लढत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे आघाडीच्या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.