होमपेज › Konkan › डोंगर खचल्याने घरावर कोसळली भिंत

डोंगर खचल्याने घरावर कोसळली भिंत

Published On: Nov 15 2017 1:48AM | Last Updated: Nov 14 2017 11:45PM

बुकमार्क करा

चौके : वार्ताहर

मालवण तालुक्यातील देवली- वाघवणे मधलीवाडी  येथील डोंगर अचानक खचला. यामुळे सुभद्रा  राजाराम चव्हाण आणि प्रमोद अनंत चव्हाण यांच्या संरक्षक भिंत कोसळून  घराच्या पाठीमागील पडवी जमीनदोस्त झाली. यामध्ये सुमारे लाखोंचे नुकसान झाले. सोमवारी दुपारी 3 वा. च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. 

 या घटनेबाबत मालवण तहसीलच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे मंगळवारपर्यंत नोंद नव्हती. एवढ्या मोठ्या घटनेबाबत मालवण तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन कक्ष अनभिज्ञ असल्याबाबत  ग्रामस्थांनी आर्श्‍चय व्यक्त करत नाराजी व्यक्त केली.

 देवली-वाघवणे गावातील अनेक घरे ही डोंगर पायथ्याशी वसलेली आहेत.  मधलीवाडी येथील डोंगर सोमवारी दुपारी 3 वा. च्या सुमारास अचानक  खचला. यामुळे चव्हाण यांच्या घरामागची संरक्षक भिंत थेट घरावर कोसळली. यामुळे घराची मागील पडवी जमीनदोस्त होत ढिगार्‍याखाली गाडली गेली. एकत्र कुटुंब पद्धती असलेल्या या घरात  आठ  माणसे राहतात.  सुदैवाने त्या वेळी घरातील व्यक्ती  बाहेर असल्याने अनर्थ टळला. 

या दुर्घटनेत संरक्षक भिंत घरावर कोसळल्याने चिर्‍यांनी बांधलेली पडवी आणि पडवीत असणारे दोन संडास, दोन बाथरुम, छप्परावरील कौले, वासे, रिपी जमीनदोस्त होऊन लाखो रुपयांचे  नुकसान झाले. मात्र महसूल कर्मचार्‍यांनी केलेल्या पंचनाम्यात केवळ 35 हजार रुपये नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या तटपुंज्या नुकसानीचा लाभ मिळेल याची शाश्‍वती नाही. 
या घटनेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. मंगळवारी मालवणचे मंडल अधिकारी मंगेश तपकीरकर, तलाठी  सुप्रिया शिवलकर, कोतवाल हरी देऊलकर, पोलिस-पाटील आनंद देऊलकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व नुकसानीचा पंचनामा केला.