Fri, Sep 20, 2019 22:03होमपेज › Konkan › विकास म्हणजे काय ते करून दाखविले : खा.विनायक राऊत

विकास म्हणजे काय ते करून दाखविले : खा.विनायक राऊत

Published On: Apr 11 2019 2:05AM | Last Updated: Apr 10 2019 10:00PM
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी

विकास म्हणजे काय हे आम्ही गेल्या पाच वर्षात करून दाखविले. राणे यांच्या सत्ता काळात अनेक समस्या शिल्लक राहिल्या होत्या, त्या सोडविल्या. अनेक अपुरे विकास प्रकल्प पूर्ण केले. गावोगावी चांगले रस्ते बनविले आणि विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात मतदार संघातील 85 टक्के गावांना भेटी दिल्या. लोकांचे अनेक वैयक्तिक प्रश्‍न सोडविले. रस्ते, पूल, पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविल्या. त्यामुळे विरोधकांना आमच्यावर टीका करण्याला वाव नाही, असे उद्गार रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संघाचे शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना काढले. 

तळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, खर्‍या अर्थाने आम्ही विकासाचा डोंगर उभा केला. देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता आणि महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीची सत्ता यामुळे आम्हाला बरीच कामे करता आली. लोकांच्या प्रश्‍नांना न्याय देता आला. गेल्या पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे अनेक विकासकामे पूर्ण करता आली. 

खा.राऊत म्हणाले, कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणार्‍या सोनवडे घाटमार्गाचा प्रश्‍न आम्ही मार्गी लावला आहे. अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याला हत्तीच्या अतिक्रमणाचा प्रश्‍न भेडसावत होता, हत्ती पकड मोहीम राबवून हा प्रश्‍न बर्‍यापैकी निकालात काढलेला आहे. चिपी विमानतळाचे काम अर्धवट होते. पाच वर्षांपूर्वी केवळ 8 टक्केच एवढेच काम झाले होते, आता मात्र हे विमानतळ बांधून पूर्ण झाले आहे. या विमानतळावर विमाने उतरू शकतात. ही कामे आम्हीच पूर्ण केली हे कुणी नाकारू शकणार नाही. वनसंज्ञेच्या जमिनीत शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. वनसंज्ञेतील जमीन काही अटी शर्तींवर आधारीत वापर करू शकतात किंवा त्या जमिनी विकू शकतात, असे अधिकार या जमिन मालकांना प्राप्त झाले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 200 गावे इकोसेन्सेटीव्हमधून वगळावीत असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आम्हाला यश मिळाले आहे.  कधी नव्हे इतका रस्त्यांच्या कामासाठी पैसा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आला आहे. त्यामुळे गावोगावचे अनेक रस्त्यांचे नुतनीकरण करण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये पुलांचे काम सुरू आहे.  टाळंबा धरणाला विरोध असल्याने हे प्रकल्प बाजूला ठेवण्यात आले आहेत. तिथे केटी बंधारे बांधून पाणी अडविण्याचा विचार सुरू आहे. मात्र इतर पाटबंधारे प्रकल्पांचे काम मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्याला यश आल्याने अरूणा प्रकल्पासाठी 1600 कोटी रूपये आणि नरडवे धरणासाठी 1200 कोटी रुपये प्राप्त झाले. राजापूर तालुक्यातील अर्जुना प्रकल्पाच्या कॅनॉलचे काम मार्गी लागले आहे. अरूणा प्रकल्पाची घळ भरणी यावर्षी होईल. नरडवे धरणाची घळ भरणीही लवकरच होईल. 

पर्यटन विकासातूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक समृध्दी  येवू शकते, यावर ठाम मत व्यक्त करून खा.राऊत म्हणाले, कोकण ग्रामीण पर्यटन योजना आम्ही आणली. या माध्यमातून कोस्टल सर्कीट विकसित झाले. प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजनेतून 100 कोटी रु. मिळाले. माचाळ आणि आंबोली या दोन पर्यटन स्थळांचा महाबळेश्‍वरच्या धर्तीवर विकास प्रक्रिया सुरू झाली आहे. मच्छीमारांचे प्रश्‍न सोडविण्यात आम्ही पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील बेरोजगारी हा मोठा प्रश्‍न आहे. आता संपूर्ण मतदारसंघात 1 लाख 40 हजार इतकी मतदारसंख्या वाढली आहे. याचा अर्थ इथला तरुण कोकणात स्थिरावू पाहतो आहे. त्याला रोजगार उपलब्ध होईल अशी परिस्थिती निर्माण होत आहे, असे सांगून खा. विनायक राऊत यांनी रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. 

रिफायनरी प्रकल्प झाला असता तर जे काही लाखभर लोकांना रोजगार मिळाले असते त्यापैकी जवळपास 95 हजार रोजगार हे हार्डवर्कचे होते. कोकणी माणूस इथे काम करू शकला नसता. उर्वरीत 5 हजार रोजगार कोकणातल्या लोकांसाठी उपलब्ध झाले असते परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाहेरून येणार्‍या कामगारांमुळे येथील संस्कृती नष्ट झाली असती. त्याशिवाय प्रदुषण व इतर प्रश्‍न होतेच. एवढे सोसून फायदा कुणाला? तर केंद्र सरकारला 50 टक्के फायदा झाला असता व सौदी अरेबिया सरकारला 50 टक्के फायदा झाला असता. यात कोकणचे मात्र फार मोठे नुकसान झाले असते. आता आम्ही सरकारकडे ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट उभे करण्याची मागणी केली आहे. फूड इंडस्ट्री निर्माण करण्याचीही मागणी आहे आणि दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी क्षेत्रात नवीन उद्योग सुचविले आहेत. 

कोकण रेल्वे लाईनवर एकूण 36 गाड्या धावतात, त्यातील तीन गाड्या कोकण रेल्वेच्या तर 32 गाड्या भारतीय रेल्वेच्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या विकासासाठी भारतीय रेल्वेकडे निधी मागितला आहे. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी साडेचार हजार कोटींची आवश्यकता आहे. वीर पर्यंत हे काम अंतिम टप्प्यात आहे. खाली मडगाववरूनही या कामाला सुरूवात झाली आहे.  आठ नवीन रेल्वेस्टेशन उभारण्यात येत आहेत. लूप लाईनमुळे रेल्वेची गती वाढणार आहे. विद्युतीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. मोबाईल व इंटरनेट नेटवर्कचे जाळे उभारण्यात येत आहे. 104 टॉवर मंजूर केले. 35 टॉवर कार्यान्वीत झाले आहेत. 17 ते 18 मनोरे उभे राहिले आहेत.  45 टॉवरच्या फाऊंडेशनचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच चांगले नेटवर्क ग्रामीण भागात मिळेल असेही खा.राऊत म्हणाले. 

जवळपास 85 टक्के गावांना आपण गेल्या पाच वर्षात भेट दिली. त्यातील सर्वच दुर्गम गावांना भेटी दिल्या. तेथील लोकांचे प्रश्‍न समजून घेतले. मतदारसंघातल्या जास्तीतजास्त माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. असे सांगून खा. विनायक राऊत म्हणाले, शिवसेना आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेद राहिलेले नाहीत. गेल्या पाच वर्षात अनेकवदा वाद झाले तरी युतीची बंधने कायम होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या पाच वर्षात अनेकदा एकत्रितरित्या कोकणात आले. जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुका आम्ही एकत्र येवून लढविल्या. आपल्या मतदारसंघात जे काही मतभेद होते ते दूर झाले आहेत. भाजपाचे नेते राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रसाद लाड व भाजपच्या इतर नेत्यांनी एकत्र बसून आता जे मतभेद होते पूर्णपणे दूर केले आहेत. त्यामुळे कटुता संपली आहे असेही खा.राऊत म्हणाले.