Tue, Sep 17, 2019 03:38होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यात ९ गावांत टँकरने पाणीपुरवठा

रत्नागिरी जिल्ह्यात ९ गावांत टँकरने पाणीपुरवठा

Published On: Apr 16 2019 2:17AM | Last Updated: Apr 16 2019 12:06AM
रत्नागिरी : प्रतिनिधी
यावर्षी पडलेल्या कमी पावसाचे परिणाम दिसून येत असून, जिल्ह्यातील 9 गावांमधील 17 टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. लांजा आणि खेड तालुक्यात दोन शासकीय टँकरने हा पाणीपुरवठा होत असून, पुढील काही दिवसांत टंचाईग्रस्तांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

कोकणात मुसळधार पाऊस पडत असला तरी पाणी साठवण्याच्या योग्य उपाययोजना नसल्याने बरेचसे पाणी समुद्रातला जाऊन मिळते. जमिनीत मुरलेल्या पाण्यावरच उन्हाळ्यात ग्रामस्थांची तहान भागते. यावर्षी पावसाने एक महिना अगोरदच ‘एक्झिट’ घेतली. अशा परिस्थितीत जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या वाढणार आहे. लांजा तालुक्यातील पालू-चिंचूर्टी गावातील दोन वाड्यांत पाणीटंचाई असून टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे.

खेड तालुक्यातही टंचाईग्रस्त वाड्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. देवसडे गावातील सावंतवाडी, जाधववाडी, मधलीवाडी या वाड्यांत दि. 21 मार्चपासून टँकर सुरू झाला. याच गावातील कदमवाडीत दि. 23 मार्चपासून टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे. खेडमधीलच खवटी येथील खालची धनगरवाडी, आंबवलीतील भिंगारा आणि चिंचवलीतील ढेबेवाडीत दि. 22 मार्चपासून टँकरने तहान भागवली जात आहे. मार्च महिन्यात एकूण सात वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात टंचाईग्रस्तांची संख्या वाढून टँकरची मागणी वाढली. सहा गावांतील 9 वाड्यांची यामध्ये भर पडली. यात लांजा तालुक्यातील पाली-चिंचुर्टीतील हुंबरवणेवाडी, खेड तालुक्यातील खवटी येथील वरची धनगरवाडी, नांदिवलीतील बौद्धवाडी आणि देऊळवाडी, दयाळमधील गौळवाडी, धुमाळवाडी आणि धाडवे बुरटेवाडी, तुळशीतील कुबजई धनगरवाडी, खोपीतील रामजीवाडी यांचा समावेश आहे. या दोन्ही तालुक्यातील टंचाईग्रस्त वाड्यांधमील1025 ग्रामस्थांची तहान टँकरच्या एकूण 107 फेर्‍यांनी भागवली आहे. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex