Mon, Sep 16, 2019 12:17होमपेज › Konkan › दहशतवादाच्या बीमोडासाठी युद्धच आवश्यक : ब्रिगेडियर महाजन

दहशतवादाच्या बीमोडासाठी युद्धच आवश्यक : ब्रिगेडियर महाजन

Published On: Mar 15 2019 1:45AM | Last Updated: Mar 15 2019 12:17AM
रत्नागिरी ः प्रतिनिधी

पारंपरिक युद्धात पाकिस्तान कधीही भारताविरुद्ध जिंकू शकत नाही. त्यामुळे पाकने अपारंपरिक म्हणजेच दहशतवादी कारवाया सुरू केल्या आहेत. हल्ल्यानंतर केवळ मेणबत्या जाळून दशहतवाद संपणार नाही तर दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी युद्धच करावे लागेल, असे प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.चीन पाकिस्तानला मोठी मदत करत आहे. त्यामुळे चिनी बनावटीच्या वस्तू देशवासियांनी खरेदी करणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.

येथील नगर वाचनालयातर्फे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या पुलवामा आणि बालाकोट कारवाईनंतर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ते म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेची जबाबदारी एकट्या सैन्यानेच स्वीकारावी असे नाही. सर्वसामान्य माणसानेही याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. आज सोशल मीडियावरून चुकीची माहिती पसरवली जात आहे. भारतात राहून भारताविरुद्ध बोलणार्‍यांकडून होणारा दुष्प्रचार वेळीच थांबवणे आवश्यक आहे. मोबाईल हे ‘न्यूट्रल’ तंत्रज्ञान आहे. त्याचा चांगला की गैर वापर करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. 

सन् 1980 सालापासून पाकिस्तानातून दहशतवादी भारतात घुसू लागले. यात आतापर्यंत 10 हजार शहिद झाले असून, 38 हजारहून दहशतवादी ठार झाले आहेत. पाकिस्तानात दरवर्षी 2 हजार दहशतवादी तयार होत आहेत. पाकिस्तान सीमेवर कडक पहारा असल्यामुळे दहशतवादी नेपाळ आणि बांगलादेश मार्गे भारतात घुसखोरी करत आहेत. पुलवामा हल्ल्यात 350 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. एकाचवेळी एवढी स्फोटके तेथे आणणे शक्य नव्हते. यासाठी 8 ते 10 जणांची मदत घेण्यात आली आहे. अशा देशद्रोह्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशात देशप्रेम वाढले. शासकीय मालमत्तेची जाळपोळ करत नागरिकांनी निषेध व्यक्‍त केला. पाकिस्तानवरचा राग काढताना आपल्याच देशाचे नुकसान करायचे हे कोणते ‘लॉजिक’ असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी स्थळांवर हल्‍ला केला. हल्ल्यापूर्वी तेथे 300 मोबाईल अ‍ॅक्टिव्हेट होते. वायुसेनाच्या 10 विमानांच्या पथकाने त्या ठिकाणांवर हल्‍ला केला. 20 ते 25 मिनिटांतच ही मोहीम फत्ते झाली. 

पाकिस्तानला नेस्तनाबूत करायचे असेल तर त्या देशाचे प्रांतिक विभाजन होणे आवश्यक आहे. कराची स्टॉक एक्सेंजची किंमत शून्य टक्के झाल्यास  पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडेल, असे सांगत त्यांनी व्याख्यानाचा समारोप केला. या कार्यक्रमावेळी महाजन यांनी काही पुस्तके वाचनालयाला भेटही दिली.

राफेल भारतात आलीच पाहिजेत

जर पाकिस्तानशी युद्ध झाले तर चीन बॉर्डरवरील आपले सैन्य पाकिस्तानच्या दिशेने वळवावे लागेल. याचा फायदा चीन घेईल. सध्या आपल्याकडे एकाच वेळी दोन्ही देशांशी लढाई करता येणार नाही. त्यामुळे अत्याधुनिक अशा राफेल विमानांची गरज भारताला आहे. राफेल विमान खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाला असेल तर भ्रष्टाचार करणार्‍यांना फासावर लटकवा; पण भारतात ही विमाने आली पाहिजेत. याबरोबरच सैनिकांकडे आधुनिक शस्त्रेही असली पाहिजेत. हे सर्व खरेदीसाठी लोकांनी इन्कम टॅक्स वेळेवर भरला पाहिजे, असेही महाजन यांनी सांगितले.