Mon, Sep 16, 2019 11:39होमपेज › Konkan › वायरी ग्रामस्थांनी महावितरण अधिकार्‍यांना विचारला जाब 

वायरी ग्रामस्थांनी महावितरण अधिकार्‍यांना विचारला जाब 

Published On: May 01 2019 1:40AM | Last Updated: Apr 30 2019 11:31PM
मालवण : वार्ताहर

मालवण-वायरी भुतनाथ शिवाजी पुतळ्यानजीकच्या ट्रान्सफॉर्मरमधून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने मंगळवारी संतप्त ग्रामस्थांनी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकार्‍यांना जाब विचारला. महावितरणच्या अधिकार्‍यांनी ही समस्या तत्काळ दूर करू, असे आश्‍वासन दिले. येत्या चार दिवसांत ही समस्या दूर न झाल्यास खळखट्याक आंदोलन छेडले जाईल. यानंतर उद्भवणार्‍या परिस्थितीला महावितरण जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला. 

वायरी भुतनाथ शिवाजी पुतळ्यानजीक असणाार्‍या ट्रान्सफॉर्मरवरून गेले चार-पाच दिवस कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. यामुळे ग्रामस्थांचे शेतीपंप, घरगुती  पंखे चालणेही कठीण बनले आहे. वायरी येथे बहुतांशी व्यावसायिकांनी पर्यटनासाठी निवास न्याहारी व्यवसाय सुरू केला आहे. मात्र सध्या कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने व्यावसायिकांना  अडचणींचा सामना करावा लागत आहे. 
वाढता उष्मा आणि कमी दाबाचा वीजपुरवठा यामुळे पंखे, एसी चालत नसल्याने पर्यटकांचेही हाल होत असून त्यांच्यातून नाराजी व्यक्‍त होत आहे. याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसत आहे. शिवाय शेतीपंपही चालत नसल्याने बागायतींचेही नुकसान होत आहे. त्यामुळे याठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा. याठिकाणच्या विद्युत तारा जीर्ण झाल्याने त्या कधीही कोसळून अपघात घडू शकतो, त्यामुळे या जीर्ण वाहिन्या बदलण्याची कार्यवाही तत्काळ व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. गावातील वीजपुरवठ्याच्या समस्येसंदर्भात वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात ही समस्या दूर न केल्यास वीज बिले भरली जाणार नाहीत. शिवाय तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला. 
देवानंद लोकेगावकर, श्याम झाड, अभय पाटकर, केदार झाड, राजन चव्हाण, महेश लोकेगावकर, परशुराम मयेकर, आनंद हडकर, काशिनाथ मांजरेकर, नंदू झाड, मुन्ना झाड, यतीन मालवणकर, कृष्णा देऊलकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.