होमपेज › Konkan › महामार्गालगत अनधिकृत बांधकामे

महामार्गालगत अनधिकृत बांधकामे

Published On: May 06 2019 1:49AM | Last Updated: May 05 2019 11:16PM
खेड : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरु आहे. तसेच महामार्गालगत अनधिकृत बांधकामे देखील जोमात सुरु असून महामार्ग बांधकाम विभाग आणि महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आत्तापर्यंत 325 कोटी रुपयांचा मोबदला प्रकल्पग्रस्तांना वितरित करण्यात आला आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाच तालुक्यातील भरणे, वेरळ आणि लोटे परिसरात मात्र संपादीत केलेल्या जागेपासून जवळच नियमबाह्य पक्‍की बांधकामे बांधली जात आहेत. भरणे गावात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे  सुरु आहेत. राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाने संपादित केलेल्या जागेपासून जवळच ही बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना महसूल विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नसल्याचे समजते.

या बाबत उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्याशी संपर्क साधला असता, कसल्याही प्रकारची परवानगी आपल्याकडून देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.  शिवाय अशाप्रकारची बांधकामे आपण हटवू असेही ते म्हणाले. तसेच अनधिकृत बांधकाम करणार्‍यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार महसूल विभागाला असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता प्रकाश गायकवाड यांनी पत्रकारांना सांगितले.