Fri, Sep 20, 2019 22:17होमपेज › Konkan › सावरकर यांच्याबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही : उद्धव ठाकरे

सावरकर यांच्याबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही : उद्धव ठाकरे

Published On: Apr 19 2019 1:50AM | Last Updated: Apr 18 2019 10:47PM
देवरूख : प्रतिनिधी

गांधी घराण्याचा देशाच्या स्वातंत्र्याशी किती संबंध आहे हे मला माहीत नाही; परंतु क्रांतिकारकांनी रक्‍त सांडले नसते तर राहुल गांधींना पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहता आली नसती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे गांधी घराण्याच्या आकलन शक्‍तीच्या पलीकडचे आहेत. ज्या सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी हालअपेष्टा सोसल्या. त्या सावरकरांबद्दल कोणी जर अपशब्द बोलत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आघाडीला दिला.  

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे युतीचे उमेदवारी विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ही सभा गुरुवारी देवरूख सावरकर चौक येथे घेण्यात आली. यावेळी हजारो शिवसैनिकांसह सचिव मिलिंद नार्वेकर, उमेदवार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, आ. सदानंद चव्हाण, राजन साळवी, प्रसाद लाड, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आ. सुभाष बने, गणपत कदम, जिल्हाध्यक्ष विलास चाळके, बाळ माने आदी उपस्थित होते. 

यावेळी ठाकरे पुढे म्हणाले, वीरांना वीर म्हणायचे नाही तर कोणाला वीर म्हणायचे?, हे काँग्रेसवाल्यांना मला विचारायचे आहे. सावरकरांचा तुमच्या अध्यक्षांनी केलेला अपमान तुम्हाला मान्य आहे का? असेल तर देशप्रेमाची व्याख्या तुम्ही तपासून पहा. असाच सडलेल्या बुद्धीचा माणूस देशद्रोहाचे कलम काढू शकतो, दुसरे कोणी काढू शकत नाही अशी शेरेबाजी राहूल गांधी यांच्यावर ठाकरे यांनी केली. डोक आणि बुध्दीचा ताळमेळ नसलेले काँग्रेसचे राहूल गांधी म्हणजे सडलेल्या बुध्दीचा माणूस अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी केली.

ठाकरे पुढे म्हणाले, रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघाला वेगळी परंपरा आहे. बॅरिस्टर अंतुले, बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते, सुरेश प्रभू अशासारखे खासदार या मतदारसंघाने दिले आहेत. ही परंपरा विसरता येणार नाही. त्यानंतरच्या काही वर्षात गुुंडागर्दी वाढली. मात्र, ही गुंडागर्दी तुम्ही कोकणवासीयांनी मोडून टाकली. यांना एकदा पाडले दोनदा पाडलेत आणि तरी सुध्दा त्यांना खुर्चीचा मोह आवरला नाही. खुर्चीचा हव्यास असलेल्यांचा आम्ही बांद्रात देखील सुफडासाफ केला. ज्यांच्या घरातच वेगळ्या निष्ठा असतील ते काय तुम्हाला शिकवणार मी इथे आल्यावर मला कळालं एकाच घरामध्ये यांच्या सगळ्या झेंड्याचे दुकान आहे, असा घणाघाती टोला नारायण राणे यांच्यावर हाणला. 

राणेंवर टीका केल्यानंतर ठाकरे यांनी आपला मोर्चा काँग्रेस राष्ट्रवादीकडे वळविला ठाकरे म्हणाले की, सगळे हिंदू एकवटल्यामुळे यांची तारांबळ उडाली. काँग्रेस राष्ट्रवादीने देशावरती दरोडा घालण्याचेच काम केले. घोटाळ्यांची यादी द्यायची झाली तर बाराखडी कमी पडेल. स्वत:च दरोडेखोर यांचा एक पाय तुरूंगात आणि एक पाय बाहेर आणि तू मत मागायला येतोस? असे खडे बोल सुनावले. देशद्रोहाचा खटला आम्ही टाकणारच नाही, असे राहूल गांधी यांनी जाहीरनाम्यात म्हटले आहे.  124 ए कलम ते रद्द करायल निघालेत. देश द्रोहाचे चोचले पुरवणार्‍या काँग्रेसला तुम्ही जवळ करणार काय आणि असे जर झाले तर भावी पिढीच्या छाताडावर देशद्रोही नाचल्याशिवाय राहणार नाहीत.

त्यागमूर्तीं अपमान सहन करणार नाही

माझ्याशी बोलताना शरद पवार म्हणाले, ज्या घराण्याने देशासाठी त्याग केला आहे, त्यांच्याबद्दल आदर बाळगला पाहिजे म्हणजे गांधी घराण्याबद्दल आदर बाळगला पाहिजे. आम्ही त्यांचा अपमान करू इच्छीत नाही. त्यांनी देशासाठी केलेला त्याग आम्ही नाकारत नाही. याचा अर्थ असा नाही की इतरांनी देशासाठी त्याग केला नाही. दुसर्‍यांनी केलेल्या त्यागाचा आणि त्यागमूर्तींचा अपमान केल्यास आम्ही कदापि सहन करणार नाही. गांधी घराण्याने केला तरी आम्ही जोडे हाणल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.