Fri, Sep 20, 2019 21:37होमपेज › Konkan › गोव्यातील दरोड्याचा कट दोडामार्गात

गोव्यातील दरोड्याचा कट दोडामार्गात

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 09 2017 10:22PM

बुकमार्क करा

दोडामार्ग : वार्ताहर

इंडियन ओवरसीज बँकेच्या काणका-गोवा शाखेवर शुक्रवारी भरदिवसा पडलेल्या दरोड्यातील मुख्य संशयिताचे दोडामार्ग कनेक्शन उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. गोव्यातील पोलिस त्याच्या शोधात शनिवारी पहाटे दोडामार्गमध्ये दाखल झाले. मात्र, त्यापूर्वीच त्याने तेथून पलायन केल्याने तो सापडू शकला नाही. या मुख्य संशयिताचे नाव राहुल गिरीधारी दास (26) असे आहे. 

तो मूळ उत्तर प्रदेशमधील आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो दोडामार्ग येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. याच ठिकाणी त्याने या दरोड्याचा प्‍लॅन बनविल्याचे समजते. शुक्रवारी गोव्यातील काणका- आबासवाडा येथील इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखेवर भरदिवसा दरोडा टाकून कॅश काऊंटरमधील 11 लाख, एटीएममधील 4 लाख व बँकेत आलेल्या ग्राहकाकडील 1 लाख असे 16 लाख रुपये दरोडेखोरांनी लुटले होते. याव्यतिरिक्‍त बँकेतील कॅशियरची एक सोन्याची अंगठी व त्याच्या मदतीला आलेल्या ग्राहकाची सोनसाखळीही दरोडेखोरांनी लांबविली होती. पळताना त्यांनी आपल्या बचावासाठी हवेत गोळीबार केला होता. 

फिल्मीस्टाईलने दरोडा 

त्यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत पळून जाणार्‍या दरोडेखोरांपैकी दोघांना पकडले होते. त्यामुळे या दरोड्यातील मुख्य संशयिताचा माग काढण्यात गोवा पोलिसांना यश आले. फिल्मीस्टाईलने टाकण्यात आलेल्या दरोड्यामुळे गोव्यात खळबळ उडाली होती. 

पोलिस तपासात या दरोड्याचा मास्टरमाईंड राहुल गिरीधारी दास हा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तो गेल्या काही महिन्यांपासून दोडामार्ग येथे एका हॉटेलमध्ये कामाला असल्याचे समोर आले. शुक्रवारी त्याचे मोबाईल लोकेशनही दोडामार्ग येथे मिळाले. त्यामुळे गोवा पोलिस मुख्य संशयिताच्या शोधात शुक्रवारी पहाटे दोडामार्ग येथे दाखल झाले. मात्र त्यापूर्वीच त्याने तेथून पलायन केले होते. 

राहमल दास हा मूळचा उत्तरप्रदेश येथील असून गुरूवारी त्याने आपल्या साथीदारांना दोडामार्गमध्ये दरोड्याच्या पूर्वतयारीसाठी बोलावून घेतले होते अशी  माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. त्यामुळे दरोड्याचा कट हा दोडामार्गमधूनच आखल्याचे पुढे येत आहे. दरोड्याच्या पूर्वसंध्येला दोडामार्ग वाहतूक पोलिस राजा राणे यांनी संशयिताची दुचाकी डबल नंबर प्लेट घातल्याच्या कारणाने तसेच वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी जप्तही केली होती. त्यांनतर दुसर्‍या दिवशीच हा दरोडा टाकण्यात आला. या दरोड्याचे कनेक्शन दोडामार्गपर्यंत आल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून परप्रांतिय कामगारांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.