होमपेज › Konkan › बदलत्या हवामानाचे हापूसवर संकट

बदलत्या हवामानाचे हापूसवर संकट

Last Updated: Nov 09 2019 2:04AM
चिपळूण : प्रतिनिधी

अवकाळी पाऊस आणि हवामानात सतत होणारा बदल याचा फटका यंदा हापूसलाही बसण्याची शक्यता बागायतदार व्यक्‍त करीत आहेत. यंदा हापूसच्या उत्पादनावर विपरित परिणाम होईल, असे गृहीत धरून बागायतदारही चिंता व्यक्‍त करू लागले आहेत. कोकणात भात पिकाबरोबरच अन्य पूरक पिके घेण्यावर शेतकरी अवलंबून असतो. मात्र, गेल्या पाच वर्षांत या पिकांची काही कारणाने नासाडी होत आहे. होणारे नुकसान व मिळणारी भरपाई याचे व्यस्त गणित असल्याने बागायत वाढविण्याकडे कल असणारे तरुण आता या क्षेत्रात वेगळे प्रयोग करण्याच्या मागे लागले आहेत. कोकणात सर्व पिके घेता येतात. मात्र, आपल्याकडे आंबा, काजू यांचे प्रमाण हे तुलनेने सर्वाधिक आहे. पूर्वी सादर झालेल्या रोजगार हमी योजनेतून त्याकाळी कोकणात मोठ्या प्रमाणावर आंबा बागा निर्माण झाल्या  व त्याने दक्षिण कोकणचे अर्थकारण पूर्णपणे बदलले.

मुंबई, पुण्यावर अवलंबून राहणारा येथील गरीब त्यानंतर आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आणि हापूसचे प्रचंड उत्पादन घेऊन त्यावर विशिष्ठ प्रयोग करुन आंब्याची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. शासनाचे या संबंधित सर्व विभाग व शेतकर्‍याला मदत देणार्‍या राष्ट्रीयकृत बँका, कृषी बँका यांच्यासारख्या माध्यमातून स्वत:च्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर हापूस लावण्याकडे कल वाढला. याचाच परिणाम कोकणातील हापूस जागतिक बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवू लागला.

दोन दशकांच्या या वाटचालीनंतर कोकणातील बागायतदारांपुढे अवकाळी पाऊस आणि खराब हवामानाचे मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातून मिळणारे उत्पन्‍न व होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही. तरीही खचून न जाता या संकटालाही येथील बागायतदार धीराने तोंड देत आहेत.

मात्र, गेली दोन वर्षे अवकाळी पाऊस आणि वादळी हवामानाने या बागायतदारांची अक्षरश: झोप उडाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक रूची असलेला हापूस हा सार्‍यांच्याच ओठावर रेंगाळत असतो. मात्र, यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मोहोर गळू लागल्याने बागा काळ्या पडू लागल्या आहेत. पुन्हा येणारा मोहोर व त्यातून निर्माण होणारे फळ हे किती प्रमाणात उपलब्ध होते यावरही बरेचकाही अवलंबून असल्याने आता भातशेतीच्या नुकसानीनंतर आंब्यावर होणार्‍या हवामानाच्या विपरित परिणामाला सामोरे जाताना शासनाने याकडे बागायतदाराला मदत देण्याच्या दृष्टीने बँका व विम्या कंपन्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली जात आहे.

रत्नागिरी जिल्हा हा हापूससाठी तर दक्षिणेकडील देवगडचा हापूस हा निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. बागायतदारांना अधिक सक्षम करण्यासाठी व संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची आवश्यक ते उपलब्धता करून देऊन बागायतदाराला धीर देण्याची मागणी होत आहे. लवकरच आंबा बागायतदारांचे शिष्टमंडळ या संदर्भातील होणारे संभाव्य धोके व उपाययोजना या बाबत शासन दरबारी गार्‍हाणे घालणार आहे. मात्र, अशा हवामानामुळे हापूसचा हंगाम यंदा किती काळ लांबेल या बाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत.