Mon, Jun 17, 2019 13:01



होमपेज › Konkan › ‘पवित्र’ला तारीख पे तारीख; शाळा निवडीला विलंब, मुलाखतीशिवाय भरतीला संस्थांचा होकार

शिक्षक भरतीचा दीड वर्ष ‘विनोद’

Published On: Apr 08 2019 1:56AM | Last Updated: Apr 07 2019 8:41PM




रत्नागिरी : प्रतिनिधी

शिक्षक भरती करण्यासाठी डिसेंबर 2018 मध्ये परीक्षा घेण्यात आली. दीड वर्ष उलटत आले तरी प्रक्रिया अजूनही गटांगळ्या खात आहे. आता पुन्हा याचिकांचे कारण शिक्षण विभागाकडून दिले जात आहे. त्यामुळे पोर्टलचा हा खेळ संपणार तरी कधी? असा सवाल सध्या भावी शिक्षकांमधून करण्यात येत आहे.

राज्य शासनाने पारदर्शकपणे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर 1 लाख 23 हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांनी 12 हजार शिक्षकांची भरती करण्यासाठी पोर्टलवर जाहिरातीही प्रसिध्द केल्या आहेत. आता उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणालीही तयार करण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात याला मुहूर्त कधी मिळणार? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

पवित्र पोर्टलद्वारे होणार्‍या शिक्षक भरतीसाठी राज्यातील 14  खासगी शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीशिवाय 1 हजार 241 शिक्षकांची गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी होकार दर्शविला आहे. यामुळे मुलाखत प्रक्रियेतून उमेदवारांची सुटका होण्यातील मार्ग मोकळा झाला आहे. या पवित्र प्रणालीद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार, पात्रतेनुसार निवडक शाळांची यादी पोर्टलवर पाहता येणार आहे.

या यादीतील पाहिजे तेवढे प्राधान्यक्रम उमेदवारांना नोंदविण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी मेरीटनुसार थेट शिक्षकांची निवड व नियुक्त्या केल्या जाणार आहेत. मात्र खासगी शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन शिक्षकांच्या निवडी करण्याचे अधिकार देण्याचा हट्ट धरला होता. तो शासनाने मान्यही केला आहे. एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीला बोलाविण्याची नियमावलीही तयार करण्यात आली आहे. मुलाखत व वर्गात शिकविण्याच्या प्रक्रियेचे व्हीडिओ शुटिंग करण्याची अटही घालण्यात आली आहे.

मुलाखत घेण्याची प्रक्रिया ही वेळखाऊ आहे. तसेच मुलाखत निवडीवरून पुन्हा शंकाही उपस्थित केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी खासगी शैक्षणिक संस्थांकडे मुलाखतीशिवाय उमेदवार निवडी करण्याबाबत विनंती केली होती. संस्थांनी ती विनंती मान्य करून प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु ही प्रक्रिया प्रत्यक्षात अंमलात केव्हा येणार? याकडे लक्ष लागले आहे.

याचिकांचा अडथळा...

उमेदवारांनी शाळांचे प्राधान्यक्रम देण्यासाठी संगणकीय प्रणाली तयार आहे. परंतु औरंगाबाद खंडपीठात इंग्रजी माध्यमातील उमेदवारांसाठी 20 टक्के राखीव जागा मिळाव्यात, बीएड् अर्हता धारक उमेदवारांना ब्रिज कोर्स करण्याची अट या विषयांवर याचिका दाखल आहेत. 20 टक्के राखीव जागा या विषयावरील याचिकेत अंतरिम आदेश झाले आहेत. परंतु याचिकेत अंतिम आदेशानंतर स्पष्टता येईल, त्यानंतर उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्याची संगणकीय प्रणाली खुली होणार आहे. मार्गदर्शक सूचना पुढील आठवड्यात उपलब्ध करण्यात येणार आहेत.