होमपेज › Konkan › चिपळुणात रात्रीस वाळू उपसा चाले!

चिपळुणात रात्रीस वाळू उपसा चाले!

Published On: Mar 29 2019 1:38AM | Last Updated: Mar 28 2019 8:29PM
चिपळूण : खास प्रतिनिधी 

महसूल, मेरीटाइम बोर्ड आणि परिवहन खात्याचे नियम धाब्यावर बसवून सध्या चिपळुणात वाळूचोरी सुरू आहे. महसूल यंत्रणा लोकसभेच्या निवडणूक कामात व्यस्त असताना चिपळुणात मात्र रात्रीस वाळू उपसा जोरात सुरु आहे. रात्रीच्यावेळी वाळू वाहतूक आणि उत्खननाला कायद्याने बंदी असताना शासन नियमांना बगल दिली जात आहे.

येथील गोवळकोट खाडीत वाळू उत्खननासाठी ड्रेझरला शासनाने मान्यता दिली. यावर्षी 67 कोटी रुपयांवर हा वाळू लिलाव झाला. मात्र, आता शासनाच्या तिजोरीत गेलेला पैसा वसूल करण्यासाठी वाळू व्यावसायिकांकडून शासकीय नियमांचे राजरोस उल्लंघन होत आहे. या खाडीत दिवसरात्र वाळू उत्खनन सुरु असल्याच्या तक्रारी आता खाडी किनार्‍यावरील लोकांकडून येऊ लागल्या आहेत.

खाडीत ड्रेझरद्वारे 24 तास वाळू काढली जात आहे. रात्रीच्यावेळी ड्रेझर चालविण्यास कायद्याने बंदी असताना याठिकाणी कायदेभंग होत आहे. शिवाय मध्यंतरी हातपाटी वाळू व्यावसायिकांना परवाना मिळाला. त्यातून पारंपरिक व ड्रेझर वाळू व्यावसायिकांमध्ये संघर्ष निर्माण झाला. आता हा वाद मिटला असून दोन्ही व्यावसायिक एक झाले आहेत. 

एकीकडे कायम सुरू असणारा ड्रेझर आणि दुसरीकडे 20 बोटींना हातपाटीसाठी मंजुरी असताना 100 बोटी खाडीत वाळू काढत आहेत. त्यामुळे दोन्ही वाळू व्यावसायिक शासनाचे नियम मोडत असल्याचे स्पष्ट होत आहे. यात जनतेचे नुकसान होत असून 4 हजार ब्रास असणारी वाळू आता सात हजार रुपयांवर गेली आहे. 

वाळू उत्खननाचे नियम या व्यावसायिकांनी धाब्यावर बसविले असून महसूल यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याशिवाय वाळू वाहतुकीसाठी रात्री बंदी असताना रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक सुरू आहे. रात्री आठ वाजल्यापासून पहाटेपर्यंत ट्रकद्वारे वाळू वाहतूक सुरू असते. शहरातील गुहागर बायपासमार्गे वाळूने भरलेले ट्रक रात्रीच्या वेळी जाताना पहायला मिळत आहेत. वाळूची चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी गेल्यावर्षी तपासणी नाके उभारण्यात आले होते. शहरातील गोवळकोट ,बहाद्दूर शेख नाका, गणेश खिंड आदी ठिकाणी हे तपासणी नाके उभारण्यात आले. मात्र, अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे आता हे नाके कुचकामी ठरले आहेत. 

परवाना नसताना वाहतूक होते कशी?

रात्रीच्यावेळी होणार्‍या बेकायदेशीर वाळू वाहतुकीकडे स्थानिक महसूल अधिकार्‍यांनी डोळेझाक केली आहे. अनेकवेळा या वाळूचा वाहतूक परवाना नसताना देखील वाहतूक करण्यात येत आहे. महसूलकडून देण्यात आलेले वाहतूक परवाने राखून ठेवत बेकायदेशीर वाळू वाहतूक करण्यात येत आहे. अशा ट्रकमध्ये परिवहन खात्याचा वाहतूक क्षमतेचा नियमही बिनदिक्कतपणे मोडला जात आहे.