होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ६६ हजार ७२० मतदार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ६६ हजार ७२० मतदार

Published On: Apr 10 2019 1:59AM | Last Updated: Apr 09 2019 10:42PM
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसभा निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी तयार झाली. या यादीनुसार जिल्ह्यात 6 लाख 66 हजार 720 एवढे मतदार निश्‍चित झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या 4 मार्च या अंतिम दिनापर्यंत करण्यात आलेल्या पुरवणी यादीत तब्बल 6 हजार 963 एवढ्या मतदारांची भर पडली आहे. तर 562 सैनिक मतदार निश्‍चित करण्यात आले आहेत. या अंतिम मतदार यादीनुसार 3 लाख 31 हजार 853 पुरुष आणि  3 लाख 34 हजार 865 महिला मतदारांचा तर 2 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

2019 मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक विभागाने 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनावर अंतिम मतदार यादी जाहीर केली होती. या मतदार यादीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 एवढे मतदार होते. त्यात  3 लाख 28 हजार 412 पुरुष तर 3 लाख 31 हजार 345  महिला  मतदारांचा समावेश होता. या अंतिम मतदार नोंदणीनंतर 2019 च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत म्हणजेच 4 मार्च पर्यंत पुरवणी यादीमध्ये नाव नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात या पुरवणी यादीत तब्बल 6 हजार 963 एवढ्या मतदारांनी आपली नावनोंदणी केली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत या सर्व नवमतदारांनाही मतदान करता येणार आहे.

पुरवणी यादीत सर्वात अधिक कुडाळ मतदारसंघात नोंद नव्याने बनविण्यात आलेल्या या पुरवणी मतदारयादीत एकूण 6 हजार 963 मतदारांनी नावनोंदणी केली असून यात सर्वात अधिक म्हणजे 3 हजार 506 एवढ्या मतदारांनी कुडाळ विधानसभा मतदारसंघात नावनोंदणी केली आहे. तर सावंतवाडी मतदारसंघात 1 हजार 892 आणि कणकवली मतदारसंघात 1 हजार 565 एवढ्या मतदारांनी या पुरवणी यादीत आपले नाव नोंद केले आहे.

एकूण मतदारांमध्ये सुमारे 7 हजारने वाढ

23 एप्रिल 2019 ला होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी निश्‍चित झाली आहे. यात एकूण 6 लाख 66 हजार 720 एवढ्या मतदारांचा समावेश आहे. यात 3 लाख 31 हजार 853 पुरुष, 3 लाख 34 हजार 865 महिला आणी 2 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. 

विधानसभा निहाय मतदार पुढील प्रमाणे  कणकवली-एकूण मतदार 2 लाख 29 हजार 526, यात 1 लाख 12 हजार 640  पुरुष व 1 लाख 16 हजार 886  महिला. कुडाळ -  एकूण मतदार 2 लाख 13 हजार 668, यात 1 लाख 6 हजार 181  पुरुष, 1 लाख 7 हजार 485 महिला आणि 2 तृतीय पंथी.  सावंतवाडी-एकूण मतदार 2 लाख 23 हजार 526, यात 1 लाख 13 हजार 32  पुरुष, 1 लाख 10 हजार 994 महिला मतदारांचा समावेश आहे.

2423 दिव्यांग मतदार

यावेळी पहिल्यांदाच दिव्यांग मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. त्याचा चांगला फायदा झाला असून जिल्ह्यात एकूण 2 हजार 423 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यात कणकवली विधानसभा मतदारसंघ 972, कुडाळ 526 आणि सावंतवाडी मतदार संघ 925 अशी नोंद झाली आहे.   या दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोपे जावे यासाठी त्यांची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. 

780 सैनिक मतदार

अंतिम मतदार यादीत 780 एवढ्या सैनिक मतदारांची नोंद झाली आहे. यात कणकवली 55, कुडाळ 163 ,सावंतवाडी 562 मतदारांची नोंद झाली आहे.