Sat, Aug 24, 2019 10:52होमपेज › Konkan › शामराव पेजेंच्या स्वप्नपूर्तीस तटकरे संसदेत हवेत : पवार

शामराव पेजेंच्या स्वप्नपूर्तीस तटकरे संसदेत हवेत : पवार

Published On: Apr 14 2019 12:24AM | Last Updated: Apr 13 2019 10:23PM
शृंगारतळी : वार्ताहर

शामराव पेजेंच्या स्वप्नपूर्तीस  सुनील तटकरे यांना दिल्लीमध्ये पाठवायचे आहे. कोकणच्या हितासाठी लढणारे अनेक नेते पाहिले. बॅ. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू यांचे नाव यामध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मात्र, त्यानंतर एकही नेता तसा झाला नाही. त्यामुळे यांंची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून तटकरे उभे आहेत. त्यांना सर्वांनी पाठिंबा दिला आहे. कोकणचे प्रश्‍न दिल्ली दरबारी ते खंबीरपणे मांडतील, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शृंगारतळीत प्रचारसभेत व्यक्त केला.

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील पाटपन्हाळे हायस्कूलच्या मैदानावर शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची प्रचार सभा झाली. यावेळी व्यासपीठावर रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे, गुहागरचे आ. भास्कर जाधव, आ. संजय कदम, प्रदेश सरचिटणीस शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जि. प.तील विरोधी गटनेते विक्रांत जाधव, तालुकाध्यक्ष विनायक मुळे, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर, पं. स. सभापती पूनम पाष्टे, सुरेश कातकर, कुमार शेटे, पद्माकर आरेकर, जि. प. सदस्या नेत्रा ठाकूर, पं. स. सदस्य, नगरसेवक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खा. पवार म्हणाले की,  आपण गेली अनेक वर्षे कोकणात येत आहोत. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून अनेक वर्षे त्यांचे काम पाहिले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षापासून आमदार, मंत्री, अर्थमंत्री, जलसंपदामंत्री अशा अनेक खात्यांचा कारभार करताना त्यांनी कोकण आणि महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले. विशेषकरुन कोकणसाठी त्यांचे योगदान आहे. अर्थमंत्री असताना मोठा निधी कोकणसाठी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे अशा व्यक्तीला दिल्लीत कोकणचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. त्यांना काँग्रेस, शेकाप व मित्रपक्षांचा पाठिंबा आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे हे उमेदवार आहेत. कृतीशिल काम करणारा हा कार्यकर्ता आहे. त्यांची राजकीय सुरुवात ग्रामीण भागातून झाली असून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडलेली आहे. आपण येथील रामभाऊ बेंडल, तात्यासाहेब नातू यांच्याबरोबर काम केले आहे. तटकरे हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन पवार यांनी केले.

युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यावर टीका करताना खा. पवार म्हणाले की, सलग सहावेळा संसदेत जाऊन मौनी सदस्य म्हणून परिचित असलेले येथील खासदार गीते यांनी तीनवेळा केंद्रात मंत्रीपद भूषविले. मात्र, या काळात देश, राज्य किंवा कोकणसाठी देखील काही केले नाही. ऊर्जामंत्री व उद्योगमंत्री असताना देखील ते कोकणसाठी काही करू शकले नाहीत, यापेक्षा दुर्भाग्य कोणते असा सवाल केला. यावेळी जनता विकासाच्या बाजूने उभी राहील, असा विश्‍वास केला. 

यावेळी सुनील तटकरे यांनी गीते यांनी आपल्यावर वैयक्तिक टीका केली आहे. मात्र, आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन प्रचार करीत आहोत, असे सांगितले. आ. भास्कर जाधव यांनी, सुनील तटकरे यांना केंद्रात पाठविणार हा आपण पवार यांना शब्द दिला आहे. तो शब्द गुहागर विधानसभा मतदारसंघातील जनतेने पूर्ण करावा, असे आवाहन केले.