Fri, Jun 05, 2020 01:53



होमपेज › Konkan › महामार्ग प्रश्‍नांबाबत सेना-भाजप आक्रमक

महामार्ग प्रश्‍नांबाबत सेना-भाजप आक्रमक

Published On: May 17 2019 1:46AM | Last Updated: May 17 2019 1:46AM




कणकवली : प्रतिनिधी

महामार्ग चौपदरीकरणामुळे कणकवली शहरात निर्माण झालेले वाहतूक कोंडीसह विविध प्रश्‍न, झारापपासून खारेपाटणपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्या, ठेकेदाराची मनमानी, अधिकार्‍यांकडून दिली जाणारी आश्‍वासने या आणि विविध प्रश्‍नांबाबत गुरुवारी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात आ. वैभव नाईक आणि भाजप नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली सेना-भाजप पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेत महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी आणि उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारला. 

उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अखेर येत्या 31 मेपर्यंतची डेडलाईन देऊन या मुदतीत महामार्गासंबंधीचे प्रश्‍न न सोडवल्यास तीव्र जनआंदोलन करून काम बंद करू, असा इशारा देण्यात आला. 

गुरुवारी सकाळी 11.30 वा. पासून आ. वैभव नाईक,  संदेश पारकर, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, भाजप तालुकाध्यक्ष संदेश पटेल, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेनेचे राजू राठोड, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेटये, बबलू सावंत, बबली राणे, बाळू मेस्त्री, गौरव हर्णे, बाबू आचरेकर, अवधूत मालणकर, राजन वराडकर, सौ. प्रज्ञा ढवण यांच्यासह अनेक कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त श्री. महाडिक, महेंद्र मुरकर, श्री. कामत आदी  प्रांत कार्यालय परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिलीप बिल्डकॉन आणि अधिकार्‍यांविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. दुपारी 12.15 वा. च्या सुमारास महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी व उपअभियंता प्रकाश शेडेकर यांचे  प्रांत कार्यालयात आगमन होताच सेना-भाजप कार्यकर्त्यांनी दोन्ही अधिकार्‍यांना धारेवर धरले आणि कार्यालयात न जाऊ देता तेथेच उन्हात थांबवून जाब विचारला. त्यानंतर प्रांत कार्यालयात तहसीलदार संजय पावसकर, पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या उपस्थित आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्तांनी एका एका मुद्द्यावर श्री. बनगोसावी आणि श्री. शेडेकर यांना जाब विचारला.  सर्व्हिस रोडच्या बाजूला पोल उभारल्यानंतर स्ट्रीटलाईट सुरू करण्याची ग्वाही उपअभियंता श्री. शेडेकर यांनी दिली होती. मात्र,त्याप्रमाणे कार्यवाही झाली नसल्याने पूर्ण 

हायवे अंधारात आहे. हायवेचे काम पूर्ण होईल तेव्हा नियमाप्रमाणे स्ट्रीट लाईट सुरू करा परंतू आधी सर्व्हिस रोडच्या बाजूने स्ट्रीट लाईट सुरू करा अशी मागणी संदेश पारकर, आ. नाईक यांनी केली. कणकवली शहरामध्ये  अरूंद सर्व्हिस रोडमुळे वाहतूक कोंडी वारंवार होत आहे. काही ठिकाणी बॅरीगेट काढण्याबाबत आश्‍वासन देऊनही कार्यवाही झालेली नाही. यावेळी श्री. बनगोसावी यांनी आरओडब्ल्यूच्या 45 मीटरपैकी 25 मीटरमध्ये उड्डाणपूल होणार आहे. उर्वरित 20 मीटरमध्ये दोन्ही बाजूने 10 मीटर जागा उरते. त्यातील 1 मीटर जागा गटारासाठी, दीड मीटर जागा नळयोजना आणि बीएसएनएल लाईनसाठी दिली आहे. उर्वरित सात मीटरमध्ये सर्व्हीस रोड करण्यात आले आहेत असे सांगितले. मात्र खरोखच आपण मोजणी करा, सर्व्हीस रोड सात मीटरचा आहे की पाच मीटरचा हे तपासा, बॅरीगेट कमी करून सर्व्हीस रोडची रूंदी 9 मीटरपर्यंत वाढवा अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी केली.  गडनदी ते कोर्ट आणि एसएम हायस्कूल ते जानवली नदीपर्यंत बॉक्सेल भिंत उभारली जाणार असून दोन्ही बाजूने सर्व्हीस रोडसाठी सात मीटर जागा राहणार आहे. मात्र तीही जागा कमी पडणार असून त्यात वाढ करण्याची मागणी संदेश पारकर यांनी केली. सर्व्हीस रोडच्या बाजूने बांधलेली गटारे निकृष्ट असून बांधकामांवर पाणी मारले जात नाही. अनेक ठिकाणी नैसर्गिक नाले भरावामुळे तुंबले आहेत. त्याची तात्काळ दुरूस्ती करा. बीएसएनएलची केबल तोडल्याने त्याचा फटका दुरध्वनी सेवेला बसला आहे.   नळयोजनेची पाईप लाईन तुटल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे याकडे आ. नाईक, पारकर यांनी लक्ष वेधले. 

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, श्रीधर नाईक पुतळा, गांगो मंदिर ही आमची श्रध्दास्थाने आहेत. त्याबाबत कोणता निर्णय घेतला हे सांगा, श्रीधर नाईक उद्यान तोडण्यात आले असून भरपाई नगरपंचायतीला दिलेली नाही, दुकाने आणि घरांमध्ये माती आणि भरावाने पावसाचे पाणी गटारात जाणार आहे. याबाबत कोणती उपाययोजना केली आहे. काही ठिकाणी नोटीसा न देताच इमारती पाडण्यासाठी सक्ती केली जात आहे. रस्त्यावर पाणी मारले जात नाही. कणकवली बसस्थानकासमोरील पत्रे काढून देतो असे सांगूनही कार्यवाही केलेली नाही. कणकवली शहरामध्ये येणारे 15 ते 20 रस्ते आहेत. त्यावरून हायवेवर ये-जा करण्याबाबत कोणतीही सुरक्षा नाही, गांगो मंदिर येथे बॉक्सेल भिंतीला अंडरपास करा, या आणि इतर मुद्यांकडे पारकर आणि आ. नाईक यांनी लक्ष वेधले. 

कुडाळ शहरामध्ये उड्डाणपूल करण्याआधी दोन्ही बाजूने आवश्यक रूंदीचे सर्व्हीस रोड करा आणि मगच पीलरचे काम करा, कणकवलीत केलेल्या चुका कुडाळमध्ये करू नका. कुडाळ शहरातही काही लोकांना मोबदला मिळालेला नाही तरीही काम सुरू करण्यात आले आहे. झाराप ते कणकवलीपर्यंत तातडीने स्ट्रीट लाईट सुरू करा अशी मागणी आ. नाईक यांनी केली. कणकवलीतही बॅरीगेट सोडून दोन्ही बाजूने 10 मीटर रस्ता आवश्यक आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जानवली शहरामध्ये 45 मीटर भूसंपादन असताना त्याच्याबाहेर जागा संपादीत केली जात आहे, हा अन्याय असल्याचे जानवली ग्रामस्थ रंजन राणे यांनी सांगितले. वागदे येथे पाण्याचा निचरा करणारे  जुने   पाईप बुजविण्यात आले असून त्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबणार आहे याकडे सौ. प्रज्ञा ढवण यांनी लक्ष वेधले.

प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत, नागरी सुविधांची बोंब आहे मात्र ओसरगाव येथे मात्र टोलनाक्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सिंधुदुर्गातील वाहनांना  टोल लावता नये अशी आग्रही मागणी संदेश पारकर यांनी केली. ओसरगाव येथे संपादित केलेल्या अतिरिक्त जमीनीच्या मोबदल्याबाबत नोटीसा दिलेल्या नाहीत याकडे बबली राणे यांनी लक्ष वेधले. कसाल हायस्कूलला हायवे जोडला असून त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी  अवधूत मालणकर यांनी   निवेदनाद्वारे केली. 

कणकवली शहरामध्ये हायवेच्या बाजूने किती अनधिकृत बांधकामे आहेत त्याचा अहवाल तयार करा, ज्यांना नोटीसा दिल्या नाहीत त्यांना नोटीसा द्या, महसूल, भूमी अभिलेख या सर्व विभागांबरोबर एकत्र बैठक घेऊन आढावा घ्या, असे श्री. पारकर यांनी सांगितले. गेली तीन वर्षे प्रकल्पग्रस्तांनी सहकार्य केले, मात्र आता प्रकल्पग्रस्तांना वार्‍यावर सोडले जात आहे हे खपवून घेणार नाही. आतापर्यंत लोक शांत होते मात्र आता लोकं शांत बसणार नाहीत, दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करा, 31 मे पर्यंत सर्व प्रश्‍न सोडवा, दुसर्‍या निवाड्यातही काही सातबारा मिसींग आहेत त्यांचा आढावा घ्या, कोणावर अन्याय होता कामा नये, पावसाळ्यापूर्वी हायवेवरील वाहतूक सुरळीत करा, 31 मे पर्यंत प्रश्‍न न सुटल्यास तीव्र जनआंदोलन करून काम बंद करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. कार्यकारी अभियंता प्रकाश बनगोसावी यांनी या विविध मुद्यांवर कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.