Fri, Feb 22, 2019 13:31होमपेज › Konkan › महामार्ग खड्डेमुक्‍त करा : चंद्रकांत पाटील 

महामार्ग खड्डेमुक्‍त करा : चंद्रकांत पाटील 

Published On: Aug 10 2018 11:57PM | Last Updated: Aug 10 2018 11:55PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

मुंबईतील बहुसंख्य कोकणवासीयांना गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचाच प्रामुख्याने वापर करावा लागतो. त्यामुळे या  महामार्गावर वाढणारा वाहतुकीचा अतिरिक्‍त ताण विचारात घेऊन गणेशोत्सवापूर्वीच हा महामार्ग खड्डेमुक्‍त करा; अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी बैठकीत दिले. तसेच, पुढील वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे प्रलंबित काम पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना दिल्या.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे प्रलंबित भूसंपादन आणि चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा बैठकीत ना. पाटील यांनी अपूर्ण कामांबाबत अधिकार्‍यांना सक्‍त सूचना दिल्या. यापुढील काळात या महामार्गाच्या कामाचा वेग कमी झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. बैठकीला सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते. 

श्री. पाटील म्हणाले, दरवर्षी गणपती उत्सवासाठी मुंबईस्थित अनेक चाकरमानी कोकणात गावी जात असतात. त्यामुळे प्रवासादरम्यान त्यांना कोणताही त्रास होऊ नये, अपघात होऊ नये याकरिता मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. महामार्गाचे प्रलंबित भूसंपादन तातडीने पूर्ण करून चौपदरीकरणाचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे निर्देशही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना दिल्या. पाली-खोपोली पर्यायी मार्गावरचे खड्डेही गणपतीपूर्वी भरून रस्ता वाहतुकीस सुयोग्य करावा. तसेच पेण-वडखळ बायपास रस्ताही खुला करावा. या महामार्गावर गणेशोत्सव कालावधीत वाढणारा वाहतुकीचा अतिरिक्‍त ताण काही प्रमाणात कमी होण्याच्या दृष्टीने मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गे देखील प्रवास करण्यात येतो. त्यामुळे या महामार्गावरील टोल नाक्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन गतवर्षी प्रमाणेच या महामार्गावरून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या वाहनांना टोलमाफी देण्यात, यावी असे निर्देश देखील बैठकीत  ना. पाटील व ना. शिंदे यांनी दिले.   

सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे धनराज तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष कार्य अधिकारी सुधीर देऊळगावकर, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे आदी उपस्थित होते.