Mon, Sep 16, 2019 06:16होमपेज › Konkan › रत्नागिरीकरांना पावसाळ्यापर्यंत नियमित पाणी

रत्नागिरीकरांना पावसाळ्यापर्यंत नियमित पाणी

Published On: Apr 02 2019 1:58AM | Last Updated: Apr 01 2019 11:06PM
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शिळ धरणात मुबलक पाणीसाठा आहे. पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्या तरी शहराचा पाणीपुरवठा एक दिवसआड करण्याची वेळ येऊ नये, यासाठी पूर्ण खबरदारी घेतली गेली आहे. त्यामुळे अगदी पावसाळा सुरू होईपर्यंत नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. देखभाल दुरुस्तीसाठी केवळ सोमवारचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे पाणीपुरवठा समिती सभापती सुहेल मुकादम यांनी सांगितले.

नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी सोमवारी पाणी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पाणीपुरवठा समिती सभापती व सदस्यांची संयुक्‍त बैठक घेतली. पाणी पुरवठ्यातील अडचणी वाढू देऊ नका, अशा सक्‍त सूचना यावेळी नगराध्यक्षांनी केल्या. त्यानंतर पाणी सभापतींनी एक दिवसआड पाणी पुरवठा करण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. लोकसभेच्या निवडणुकीचे 23 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर रत्नागिरी शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची गैरसोय होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पानवल धरणातील पाणीसाठा फेब्रुवारीतच संपला. त्याचा परिणाम म्हणून शहरातील पाणी पुरवठ्याचा संपूर्ण भार शिळ धरणावर आला. या धरणावरून येणार्‍या जलवाहिनीचे आयुष्य संपले आहे. ही जलवाहिनी वरचेवर फुटते. त्याचबरोबर या धरणावरचा वीज पुरवठा अधूनमधून खंडित होतो. या तांत्रिक अडचणीमुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येतो. पण या दुरूस्तीची कामे तातडीने करून घेतली जात आहेत. शहरात सीएनजी (घरगुती गॅस) वाहिनी, नवीन पाणी योजनेची वाहिनी टाकण्यासाठी अनेक ठिकाणी खोदाई होत आहे. या खोदाईमुळे त्या-त्या ठिकाणची नळाची पाईप लाईन फुटत असल्यानेही त्या परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होतोय. ही खोदाई करणार्‍यांना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचेही पाणी समिती सभापती मुकादम यांनी सांगितले.