Tue, Oct 23, 2018 16:57होमपेज › Konkan › रिफायनरी विरोधक शिवसेना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

रिफायनरी विरोधक शिवसेना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

Published On: Oct 12 2018 1:03AM | Last Updated: Oct 12 2018 1:03AMराजापूर : प्रतिनिधी

संपूर्ण विरोध असतानादेखील शासनाने रिफायनरी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीने प्रकल्प परिसरात येऊ नये, यासाठी दक्षिण रत्नागिरी विभागातील शिवसेनेचे आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व लोकप्रतिनिधी हे खा. विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 15 रोजी दुपारी 1 वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक  देणार आहेत, अशी माहिती आ. राजन साळवी यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाविरोधात शंभर टक्के विरोध असतानादेखील शासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष करुन रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या  जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्य सचिव सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली आहे. शिवसेनेने तर त्या समिती विरोधात जोरदार विरोध करताना समितीला नाणार परिसरात पाय ठेवायला देणार नाही, असा सणसणीत इशारा खा. विनायक राऊत व आ. राजन साळवी यांनी दिला होता. पुढील काही दिवसांत ती समिती नाणारमध्ये कधीही येईल, अशी शक्यता असल्याने दक्षिण रत्नागिरीतील रत्नागिरी, संगमेश्‍वर, लांजा व राजापूर तालुक्यांतील शिवसेनेचे आमदार, जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समित्यांचे पदाधिकारी, सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक असे सर्वजण खा. विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत.