होमपेज › Konkan › झाशीच्या राणीचे स्मारक अडकले लालफितीत!

झाशीच्या राणीचे स्मारक अडकले लालफितीत!

Published On: Nov 22 2018 1:17AM | Last Updated: Nov 21 2018 9:42PM



लांजा : जगदीश कदम 

इंग्रज सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकणार्‍या मनकर्णिका तांबे- नेवाळकर म्हणजेच झाशीच्या राणी यांची भारतीय इतिहासात रणरागिणी म्हणूनच ओळख आहे. झाशीची राणी यांच्या जाज्वल्य इतिहासाची माहिती आजच्या पिढीला व्हावी, खर्‍याअर्थाने राणीचा ऐतिहासिक पराक्रम ज्ञात व्हावा या उद्देशाने त्यांच्या स्मारकाची उभारणी व्हावी यासाठी सासर-माहेरच्या कोट-कोलधे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, लालफितीच्या कारभारात अडकलेल्या या स्मारकाची उभारणी केवळ सरकारी उदासीनतेमुळेच रखडली असल्याचे स्पष्ट होत आहे.

‘मेरी झांशी नही दुंगी’ अशी गर्जना करून इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणार्‍या राणी लक्ष्मीबाईंच्या लांजा तालुक्यातील कोट येथील घराच्या चौथर्‍यावर बहुउद्देशीय सभागृहारुपी इतिहासकालीन आणि आधुनिक सोयीसुविधांनीयुक्त वास्तू  स्मारकरुपी उभे रहावे, यादृष्टीने झाशीच्या राणीचे माहेर आणि सासर असलेल्या कोट-कोलधे या जोडग्रामांमध्ये ग्रामस्थांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

स्मारकासाठी सासर - माहेरची एकी

मनकर्णिका तांबे ऊर्फ झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या माहेरचे गाव कोलधे आहे. ही मनकर्णिका पुढे झाशी संस्थानाधिपती गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी विवाहबद्ध होऊन झाशीची राणी झाली. हे नेवाळकर कुटुंबीय कोट गावचे म्हणजे सासर कोट आहे. ही दोन्ही गावे एकमेकांलगत आहेत. या गावांमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या कार्यकाळातील सर्व संदर्भीय पुस्तके जमा करणे, कोकणच्या इतिहासाची ओळख करून देणारे संदर्भीय दालन उभारणे, दिशादर्शक फलक लावणे, 

माहेरच्या घराच्या मूळ रचनेत कोणतीही बाधा न आणता भक्कम करणे, सासरच्या गावी स्मारक आणि सभागृह बांधणी, चित्रमय इतिहास उभारणे आदी उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामध्ये स्मारक उभारणी हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांचे आजचे वंशज आणि ग्रामस्थ राणींचा हा वारसा व या गावांशी असलेले मूळ संदर्भ जपले जावेत, या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत आहेत.

शासनाकडून प्रयत्नच नाहीत

सन 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील राणी लक्ष्मीबाईंचे योगदान महत्त्वाचे आहे. राणींच्या इतिहासाची खरी ओळख व्हावी आणि आजच्या पिढीला हा इतिहास समजावा आणि त्यातून प्रेरणा मिळावी हा मुख्य हेतू ठेवून हे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला ‘निवेदिता प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेने हा इतिहास लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा प्रयत्न केला होता. मात्र, दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेण्याची ठाम मानसिकता घेतली. यासाठी विधायक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या स्मारकाच्या रूपाने राणींच्या इतिहासाचे स्मरण जगाला अनुभवता येणार आहे. मात्र, शासनाने त्यादृष्टीने अद्यापही प्रयत्न सुरू केलेले नाहीत.

लोकप्रतिनिधींची उदासीनता

या चौथर्‍याचे केवळ अवशेष असून आजूबाजूला झाडे वाढली आहेत. स्मारक समितीच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे. तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी याकामी घेतलेला विशेष पुढाकार सध्याच्या  शासनाच्या काळात सत्ताधारी असूनही बासनातच गुंडाळलेला राहिला आहे.  खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्याकडूनही यासाठी विशेष पाठपुराव्याची गरज असताना तो झाला नाही.