Sat, Jul 04, 2020 04:27होमपेज › Konkan › जिल्ह्यातील कातळशिल्पांचे प्रस्ताव लालफितीत

जिल्ह्यातील कातळशिल्पांचे प्रस्ताव लालफितीत

Published On: May 08 2019 1:57AM | Last Updated: May 07 2019 10:59PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील कातळावर अनेक ठिकाणी कोरण्यात आलेली शिल्पे प्रकाशात आल्यानंतर त्यांचे जतन करण्याच्या द‍ृष्टीने धडपड सुरू आहे. ही कातळशिल्पे व त्यांची माहिती भावी पिढीला समजावी, यासाठी पुरातत्त्व विभागाकडून ती राज्य संरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील 10 प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले असून, वर्ष उलटत आले तरी या प्रस्तावांची फाईल पुढे सरकलेली नाही. शासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचा फटका या  कातळशिल्पांना बसत आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसलेल्या कातळशिल्पावर तीन वर्षांपासून संशोधन सुरू आहे. कातळ शोध शिल्प मोहिमेचे प्रमुख सुधीर रिसबुड, धनंजय मराठे आणि डॉ.सुरेंद्र ठाकुरदेसाई यांच्यामार्फत कातळशिल्प शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. या प्रमुख संशोधकांच्या पथकाने कातळशिल्पांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. जिल्ह्यातील 52 गावांमध्ये एक हजार कातळशिल्पे सापडली होती. ही सर्व अश्मयुगीन काळातील कातळचित्र असून, त्यांचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनीही  संशोधकांसोबत पुढाकार घेतला आहे. उक्षी आणि देवाचे गोठणे येथील कातळशिल्पाचे ग्रामपंचायत, लोकसहभागातून संरक्षण करण्यात आले आहे. 

उक्षी (रत्नागिरी), देवीहसोळ (राजापूर), बारसू येथील दोन (राजापूर), कशेळी (राजापूर), चवे, देवूड (रत्नागिरी), रामरोड  नेवरे (रत्नागिरी), उमरे (रत्नागिरी) या कातळशिल्पांचे प्रस्ताव मंत्रालयात गेले आहेत. तर निवळी गावडेवाडी, उमरे, कापडगाव, जांभरुण, पोचरी, मेर्वी, देवाचेगोठणे, सोलगाव, सोगमवाडी येथील कातळशिल्पांचे प्रस्ताव रत्नागिरी येथील पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयामार्फत वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आले आहेत.  वर्षभरापूर्वी पाठवण्यात आलेल्या दहा कातळशिल्पांचे प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु, गेल्या वर्षभरात कातळशिल्पे राज्यसंरक्षित करण्याची प्राथमिक अधिसूचनाही काढण्यात आलेली नसल्याबद्दल खंत व्यक्‍त केली जात आहे.

पर्यटक येतात तरीही...

रत्नागिरी जिल्ह्यातील कातळशिल्प पाहण्यासाठी स्विडन, अमेरिका, आस्ट्रेलिया, युके, फ्रान्स येथून पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. कातळशिल्प अतिप्राचीन असल्याने त्यामध्ये मानवी संस्कृतीच्या इतिहासाची माहिती मिळू शकते. कातळावरती चिरेखाणींचे खोदकाम, रस्ता करत असताना शिल्पे नष्ट होऊ नयेत, यासाठी  कातळशिल्प राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पुरातत्त्व विभागामार्फत कातळशिल्प राज्य संरक्षित करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.