Fri, Sep 20, 2019 22:10होमपेज › Konkan › सत्तेचे लाभ घेता आणि जनतेच्या हिताआड का येता? 

सत्तेचे लाभ घेता आणि जनतेच्या हिताआड का येता? 

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 02 2018 10:39PMकणकवली : प्रतिनिधी

नाणार रिफायनरी प्रकल्प हा जनतेच्या हिताचा आणि इथल्या बेरोजगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळवून देणारा आहे. असे असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना आणि स्वाभिमान हे दोन्ही पक्ष या प्रकल्पाला बेगडी विरोध करत आहेत. मुळात हे दोन्ही पक्ष एनडीएचे घटक पक्ष असल्याने नाणार प्रश्‍नी त्यांचे जे काही प्रश्‍न, आक्षेप आहेत त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करू शकतात. मात्र, तसे न करता ते केवळ विकासाचा खेळखंडोबा करत असून दोन्ही पक्षाच्या हेतूंबाबत शंका आहे. सत्तेचे लाभ घेऊन जनतेच्या हिताच्या आड तुम्ही का येता? असा सवाल भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांनी शिवसेना, स्वाभिमान पक्षाला केला. 

कणकवलीतील भाजपच्या  संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, कणकवली तालुका सरचिटणीस बबलू सावंत उपस्थित होते. जठार म्हणाले, झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येते, मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या विरोधकांना जागे कसे करता येईल? हे दोन्ही पक्ष एनडीएचे घटक पक्ष आहेत. दोन्ही पक्षांचा मुख्यमंत्र्याशी अ‍ॅप्रोच आहे. त्यामुळे नाणारप्रश्‍नी जर त्यांच्या मनात जे काही प्रश्‍न असतील ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सोडवून घेत त्यांनी जनतेला विश्‍वास द्यायला हवा.

प्रसंगी सरकारकडून प्रतिज्ञापत्र घेता येणे शक्य आहे. मात्र तसे न करता केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वाभिमान आणि शिवसेनेचा आटापिटा सुरू आहे. जैतापूरला पाठिंबा दिला म्हणून आम्ही हरलो, आम्हाला निवडणूक महत्त्वाची आहे, असे ही मंडळी सांगतात. मात्र, तुमची बांधिलकी जनतेशी आहे, जनतेला रोजीरोटी  हवी आहे, इथल्या बेरोजगारांच्या हाताला काम हवे आहे, याचा विचार विरोध करणार्‍यांनी करायला हवा. कोकणातील समुद्राला चांगली खोली आहे, विजयदुर्ग बंदराची 19 मी. खोली आहे, ही खोलीच सिंधुदुर्गला श्रीमंत करणार आहे. कोकणच्या विकासाची उंची ही समुद्राच्या खोलीत आहे. त्यामुळे या विकासाच्या आड न येता शिवसेना, स्वाभिमानने नाणार प्रकल्पाला सहकार्य करायला हवे, असे मत प्रमोद जठार यांनी व्यक्त केले.