होमपेज › Konkan › त्यांच्याकडे लक्ष देण्यासारखे काहीच नाही : विनायक राऊत 

त्यांच्याकडे लक्ष देण्यासारखे काहीच नाही : विनायक राऊत 

Published On: Feb 12 2019 1:06AM | Last Updated: Feb 12 2019 1:06AM
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

शिवसेनेने ज्यांना भरभरून दिले. काँग्रेसनेही मान-सन्मान राखला. आता भाजपवरही अशीच वेळ आली आहे. अशा प्रतारणा करणार्‍या व्यक्‍तिमत्त्वांकडे लक्ष देण्यासारखे काही नाही, अशा शब्दांत खा. विनायक राऊत यांनी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात विरोधकांवर टीकास्र सोडले. ‘म्हाडा’ अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी आमचे लक्ष शिव्या, बदनामीकडे नाही तर विकासाकडे असल्याचे प्रतिपादन केले.

पावस-गोळप जिल्हा परिषद गटाचा मेळावा पावस येथे रविवारी झाला. मेळावा रात्री उशिरा होऊनही हजारोंची गर्दी होती तशी राहिली. ही गर्दी पाहून जनता आमच्यासोबत असून, शिवसेनेचे लोकसभा उमेदवार विनायक राऊत यांचे मताधिक्य वाढणारच असल्याचा विश्‍वास आ. सामंत यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केला.

आम्ही शिव्या, बदनामीकडे लक्ष न देता विकासकामांकडे लक्ष केंद्रीत केली असून, रविवारी एका दिवसात 13 कोटी रूपयांच्या विकासकामांचे  भूमिपूजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

खा. विनायक राऊत यांनीही समाचार घेताना सांगितले की, शिवसेैनिकांनीही त्यांच्या बडबडीकडे लक्ष देऊ नये. साडेतीन हजार फुटांच्या माचाळवर जाणारा मी पहिलाच खासदार आहे. त्यामुळे शिवसेनेची विकासात्मक भूमिका कशी आहे, हे स्पष्ट होते. मागच्या निवडणुकीत स्वरूपानंदांच्या पावस पुण्यभूमीतून संपर्काला प्रारंभ केला होता.आजही तेथूनच सुरूवात करत आहे, असेही खा. राऊत यावेळी म्हणाले.
या मेळाव्याला जिल्हाप्रमुख विलास चाळके, नगराध्यक्ष राहुल पंडित, प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा महिला संघटक वेदा फडके आदी उपस्थित होते.