होमपेज › Konkan › हातखंबा येथे वाहन तपासणीवेळी शिवीगाळ; जामिनावर मुक्‍तता

नीलेश राणेंसह १५ जणांना अटक

Published On: Apr 13 2019 1:43AM | Last Updated: Apr 12 2019 10:40PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

मंगळवारी रात्री हातखंबा येथे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथकाककडून वाहनांची तपासणी सुरू असताना, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करत शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला होता.

याप्रकरणी शुक्रवारी नीलेश राणेंसह 15 जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. कायदेशीर कार्यवाही करून सर्वांना टेबल जामिनावर सर्वांची मुक्‍तताही करण्यात आली.

नीलेश नारायण राणे (38, रा. उद्यमनगर, रत्नागिरी), गौरांग खानविलकर (40, मुंबई), मयूर रावणांक (27),     श्‍वेतांग वायंगणकर (27), सिध्देश नेरकर(24), योगेश मांजरेकर(27, सावंतवाडी), तुषार पाटील (40, रा.मुंबई), संदेश आरुंदेकर(26, सावंतवाडी), सिध्देश मालवणकर(28, रा.सावंतवाडी), चिनार मलुष्टे (25,तेलीआळी, रत्नागिरी), अभिलाष कारेकर (26, घुडेवठार, रत्नागिरी),  गिरीष ओझा (39, मालाड, मुंबई), नंदकिशोर चव्हाण (33, रा. नाचणेरोड,रत्नागिरी)  पराग पाटील (25,तेलीआळी, रत्नागिरी), आणि सुभाष पवार(40, रा.चाळकेवाडी,रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या 15 जणांची नावे आहेत.

मंगळवारी रात्री हातखंबा येथे वाहनाची तपासणी सुरु असताना नीलेश राणे व त्यांचे सहकारी हातखंबा येथून रत्नागिरीच्या दिशेने येत होते. यावेळी त्यांना वाहन तपासणीसाठी थांबवले असता, राणे व सहकार्‍यांनी शिवीगाळ केली. त्याचबरोबर जमावबंदी आदेशाचे उल्‍लंघन केले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी शुक्रवारी नीलेश राणेंसह 15 जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या सर्वांना टेबल जामीन देण्यातही आला.