Mon, Jul 06, 2020 17:18होमपेज › Konkan › सरकारविरोधात मनसेचे घंटानाद आंदोलन

सरकारविरोधात मनसेचे घंटानाद आंदोलन

Published On: Nov 01 2018 1:07AM | Last Updated: Oct 31 2018 9:07PMकणकवली : वार्ताहर

निवडणुकीपूर्वी जनतेला विकासाचे स्वप्न दाखवून अच्छे दिन आणण्याचे वचन दिलेले असताना भाजप शासनाने सर्वस्तरातील नागरिकांना आता बुरे दिन आणले आहेत. जनतेचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध करण्यात आला. 

मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन छेडले.  त्यानंतर  प्रांताधिकारी  नीता शिंदे- सावंत यांच्याकडे  मुख्यमंत्र्याना देण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले.  महिला जिल्हाध्यक्षा चैताली भेंडे, कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, कणकवली शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर, मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष अनिल राणे, संतोष कुडाळकर, प्रभाकर राणे आदी उपस्थित होते. भाजप नेत्यांनी  निवडणुकीपूर्वी प्रचार सभेमधून व जाहिरनाम्यातून जनतेला विकासाची स्वप्ने दाखविली होती. मात्र, गेल्या चार वषार्ंत महागाईचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. रोजगार देणारा एकही  उद्योग हे शासन  निर्माण करू शकलेले नाही. नोटबंदीनंतर हजारो लोक बेरोजगार झाले आहेत.  शेतकरीही देशोधडीला लागले आहेत. या धक्क्यातून सर्वसामान्य जनता अजूनही सावरलेली नाही.  पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे  सर्वसामान्यांची  आर्थिक कोंडी झाली आहे, गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. निराधार पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिक आणि कलाकारांची पेन्शन थकली आहे. रास्त दराची दुकाने बंद होण्याच्या स्थितीत आहेत. शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कामगा शासनाविरोधात आंदोलन करीत आहेत. शिक्षकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असून त्यांना आंदोलने करावी लागतात हे निषेधार्ह आहे. अनेक अधिकार्‍यांकडून भ्रष्टाचार होत असून त्यांच्यावर कोणाचाच वचक राहिलेला नाही. जिल्ह्याबरोबर संपूर्ण देशातच खून , दरोडे, बलात्कार अशा घटनांचे प्रमाण वाढले असून जनता मेटाकुटीस आली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते खड्डेमय बनले असून धरणांची कामे ठप्प आहेत. शासकीय आरोग्यसेवा जनतेला व्यवस्थितरीत्या न मिळाल्याने काही खासगी डॉक्टरांकडून जनतेची  लूट होत आहे. अशा स्थितीत जनतेच्या भावना शासनापर्यन्त पोहचविण्यासाठी तसेच शासनाला जाग आणण्यासाठी हे घंंटानाद आंदोलन करण्यात येत असल्याचे राजन दाभोळकर यांनी सांगितले.