Mon, Sep 16, 2019 12:00होमपेज › Konkan › आमदार उतरले शेतावर...शेतकर्‍यांशी साधला संवाद!

आमदार उतरले शेतावर...शेतकर्‍यांशी साधला संवाद!

Published On: Feb 05 2019 1:56AM | Last Updated: Feb 04 2019 10:02PM
माणगांव : वार्ताहर 

कुडाळ तालुक्यातील ‘चांदा ते बांदा’ रब्बी क्षेत्र विस्तार कार्यक्रमांतर्गत लागवड केलेल्या शेतकर्‍यांच्या प्रक्षेत्रांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आ. वैभव नाईक यांनी कृषी अधिकार्‍यांसमवेत भेटी देत थेट शेतावर जाऊन पाहणी केली. ‘चांदा ते बांदा’ या योजनेचा लाभ घेऊन शेतकर्‍यांनी आर्थिक उत्पन्‍न वाढवावे असे आवाहन आ.नाईक यांनी करत तालुका कृषी विभागाच्या कामांचे कौतुक केले. आ.वैभव नाईक यांनी थेट शेतावर जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधल्याने शेतकरीवर्गालाही प्रोत्साहन मिळाले.

‘चांदा ते बांदा’ योजना रब्बी क्षेत्र विस्तार कार्यक्रमांतर्गत कुडाळ तालुक्यातील माणगांव खोर्‍यात मोठ्या प्रमाणात शेकर्‍यांनी विविध पिकांची लागवड केली आहे. यात श्री पद्धतीने भात लागवड, चवळी, भुईमूग, मका, कांदा लागवडीची पाहणी आ. वैभव नाईक यांनी थेट शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन केली. तसेच शेतकर्‍यांकडून लागवडीची माहिती घेत त्यांना आवश्यक मार्गदर्शन करून सहकार्याची ग्वाही दिली. ‘चांदा ते बांदा’ योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीतून आर्थिक समृद्ध बनावे,असे आवाहन त्यांनी शेतकर्‍यांना केले. आ. नाईक यांनी थेट शेतावर येऊन प्रत्यक्ष संवाद साधल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर एकप्रकारे समाधान फुलले होते. आ.नाईक यांच्या समवेत जि.प.सदस्य राजू कविटकर, कुडाळ तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, मंडळ कृषी अधिकारी उत्तम मंदावाड, कृषी पर्यवेक्षक नीलेश उगवेकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्रीम. आर.आर.कुडाळकर, कृषी सहाय्यक आर.एस.चव्हाण, पी.एन.बाविस्कर, श्री.डिसोजा, श्री.मोरे, आदी उपस्थित होते.

पुळास येथील सोमनाथ सावंत, यशवंत तावडे, गणपत निकम, रविकांत दळवी, विश्राम निकम, आनंद सावंत, कालेली येथील सदानंद सावंत, माणगाव येथील विठ्ठल देसाई, संतोष देसाई या शेतकर्‍यांच्या प्रक्षेत्रांसह माणगाव येथील डॉ.हेडगेवार प्रकल्प येथील मका लागवडीची आ.नाईक यांनी पाहणी केली. कृषी विभागाच्या कामासह शेतकर्‍यांनी केलेल्या लागवडीबाबत त्यांनी समाधान व्यक्‍त केले. दरम्यान, आ.वैभव नाईक यांनी पुळास ग्रा.पं.ला भेट देत विकास कामांबाबत चर्चा केली. सरपंच आत्माराम सावंत, उपसरपंच विठ्ठल निकम, ग्रामसेवक पेडणेकर, तलाठी राजूलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.