Sat, Jul 04, 2020 20:04होमपेज › Konkan › बुडणार्‍या बारा पर्यटकांना जीवदान

बुडणार्‍या बारा पर्यटकांना जीवदान

Last Updated: Nov 09 2019 2:04AM
रत्नागिरी ः प्रतिनिधी

तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात शुक्रवारी बुडणार्‍या बारा पर्यटकांना येथील स्थानिक तरुणांनी जीवदान दिले. बुडणार्‍या पर्यटकांमध्ये रत्नागिरी, बदलापूर, नाशिक, हिंगोली, औरंगाबाद येथील पर्यटकांचा समावेश आहे. 

पर्यटक बुडण्याची पहिली घटना दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. रत्नागिरी शहरातील चारजण गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी गेले होते. यामध्ये मारिया अखिल फकीर (12), सिमरन अखिल फकीर (16), मुबारक शेख (20) आणि रत्नादीप हरिहर शहा (24, सर्व रा. नाचणे) यांचा समावेश होता. दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास हे चारही जण पोहण्यासाठी गणपतीपुळे येथे समुद्रात उतरले होते. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात ओढले गेले. समुद्रात बुडू लागल्याने चौघांनीही आरडाओरड केली. चौघांचा आवाज ऐकून किनार्‍यावरील जीवरक्षकांनी आणि ग्रामस्थांनी या चौघांचे प्राण वाचवले. 

दुसर्‍या घटनेत सायंकाळी चार वाजता बदलापूर येथून आलेले पाचजण बुडत असल्याची घटना घडली. यामध्ये  प्रणय दत्तात्रय भिसे (18),  दीपक तुकाराम हरडकर (30), विनय रविंद्र भिसे (27), भालेश गजानन भिसे (27) आणि विकास गजानन भिसे (24) हे गणपतीपुळेत देवदर्शनासाठी आले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हे पाचहीजण समुद्रात आंघाळीसाठी उतरले असताना खोल पाण्यात बुडू लागले. त्यांनाही जीवरक्षक आणि स्थानिक विक्रेत्यांनी समुद्रातून बाहेर काढले. 

तिसर्‍या घटनेत मनिष सुरेश सोनवणे (31, रा. औरंगाबाद) महेश अशोक जाधव (39, नाशिक) आणि विशाल लक्ष्मण शिंदे (21, हिंगोली) या तिघांना गणपतीपुळे समुद्रात बुडताना वाचण्यात आले. 
स्थानिक तरुण व सुलभ शौचालय चालक  निखिल सुर्वे, जीवरक्षक आशिष माने, अनिकेत राजवाडकर, ओंकार गवाणकर, मयुरेश देवरुखकर आणि अक्षय माने तसेच वॉटर स्पोर्टचे चालक मोमिन खान, चेतन बोरकर, प्रशांत बोरकर आणि नूर खान यांनी बुडणार्‍या 12 जणांचे प्राण वाचवले.