होमपेज › Konkan › राज्य सरकारची  योजना; 10 रोपे मिळणार विनामूल्य; उत्पन्न मुलींच्या कौशल्य विकासासाठी

कन्येच्या आगमनाने येणार ‘वनसमृद्धी’

Published On: May 12 2019 2:04AM | Last Updated: May 11 2019 10:33PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासोबतच वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी कन्या वनसमृद्धी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली. या योजनं अंतर्गत मुलगी जन्माला येणार्‍या शेतकरी कुटुंबास वृक्ष लागवडीसाठी राज्य सरकारतर्फे मदत केली जाणार आहे. गतवर्षीपासून ही योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

पर्यावरणाचे संतुलन सांभाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून शासनातर्फे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. वृक्ष लागवडीबाबत सकारात्मकता निर्माण व्हावी, यासाठी राज्य सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच महिला सक्षमीकरणही साधले जावे यासाठी वन विभागातर्फे एक विशेष योजना तयार करण्यात आली आहे. त्याअंतर्गत मुलगी जन्माला येणार्‍या शेतकरी कुटुंबाला सरकारकडून 10 रोपे विनामूल्य देण्यात येणार आहेत. त्यात साग, आंबा, फणस, कोकम, जांभुळ व चिंचेची रोपे देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन मुलींसाठीच दिला जाईल. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत जन्म झालेल्या मुलींच्या पालकांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यानंतर त्यांना सामाजिक वनीकरण किंवा वन विभागाकडून 10 रोपे उपलब्ध करून देण्यात येतील.यासाठी सातबारा उतार्‍याची आवश्यकता आहे. लाभार्थींनी त्यांची लागवड 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत करावयाची आहे. 

फळबाग लागवड योजनेतून या लाभार्थ्यांना मदत करण्याबाबतही विचार करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा संदेश देण्यासह मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 

लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे उत्पन्न मुलीच्या कौशल्य विकासासाठी वापरण्यास शेतकर्‍यांना मुभा राहणार आहे. लागवड केलेली झाडे जिवंत राहण्यासाठी व निरोगी वाढ होण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे तांत्रिक सल्ला दिला जाणार आहे. दरवर्षी 31 मे रोजी शेतकर्‍यांना ग्रामपंचायतीस जिवंत रोपांची माहिती सादर करावी लागणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकावर राहणार आहे.