Wed, Jun 03, 2020 04:36होमपेज › Konkan › जिल्ह्यात धुवाँधार

जिल्ह्यात धुवाँधार

Published On: Jul 12 2019 2:08AM | Last Updated: Jul 12 2019 2:02AM
कुडाळ/दोडामार्ग/खारेपाटण : प्रतिनिधी

बुधवारी सायंकाळपासून जिल्ह्यात संततधार तर कधी मुसळधार पाऊस कोसळत आहे.  जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. ग्रामीण भागातील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने वैभववाडी, माणगाव, साटेली-भेडशी परिसरातील अनेक गावांचा वाहतूक संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी वादळी पावसामुळे घरांवर, वीज वाहिन्यांवर झाडे पडून नुकसान झाले. यामुळे अनेक गावांमधील वीज व दूरध्वनी सेवाही ठप्प झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्यात 15 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

गेले चार दिवस समाधानकारक असलेल्या पावसाने बुधवार रात्रीपासून जोर धरला आहे. विशेषतः सह्याद्रीपट्टा व किनारपट्टी भागात पावसाचा जोर जास्त आहे. गुरुवारी दुपारपर्यंत तर मुसळधार पाऊस कोसळत होता. यामुळे रस्ते, परिसर जलमय होऊन जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले. वैभववाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुखनदीला महापूर आला तर दुपारी समुद्राला भरती आल्याने या नदीचे पाणी खारेपाटण परिसरात घुसले. सुखनदी सध्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून खारेपाटणवासीयांवरील संकट वाढले आहे. 

गुरुवारी दुपारी 3 वा. च्या दरम्याने समुद्राला भरती आली. परिणामी वाघोटण खाडीचे पाणी खारेपाटण बंदरापर्यंत पसरले. साहजिकच सुखनदीचे पाणी खारेपाटणमध्ये घुसण्यास सुरुवात झाली. यामुळे घोडेपाथर बंदर मुख्य रस्ता, बंदरवाडी रस्ता, कपिलेश्‍वर भाटले आदी परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला. पावसाचा जोर कायम राहिल्यास रात्री हे पाणी खारेपाटण बाजारपेठेत घुसण्याची भीती आहे. या पूरपरिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर खारेपाटण परिसरातील शाळा, महाविद्यालये दुपारीच सोडण्यात आली तर बाजारपेठेतील व्यापार्‍यांनी दुकानातील माल वेळीच सुरक्षितस्थळी हलविला. गुरूवार दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने नागरिकांना सुटकेचा निःश्‍वास टाकला. खारेपाटण जैनवाडी येथे महामार्ग चौपदरीकरणाचा भराव टाकण्यात आल्याने जैनवाडीबरोबरच स्मशानभूमी व कालभैरव परिसरात पाणी घुसले होते. या पुरपरिस्थितीवर खारेपाटण तलाठी व पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी लक्ष ठेवून होते. 

दोडामार्ग तालुक्याचे जनजीवन विस्कळीत 

मुसळधार पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील बहुतांश गावांचा वाहतूक संपर्क खंडित झाला आहे. साटेली-भेडशी येथे पुलावर पाणी आल्याने दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावरील वाहतूक गुरूवारी दिवसभर ठप्प होती. यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील वस्तीच्या एसटी व कदंबा गाड्या अडकून पडल्या. मुसळधार पावसामुळे शेतीही जलमय झाली आहे.भात लावणीची कामे बंद करावी लागली. मालवण तालुक्यातही वादळी पावसामुळे काही ठिकाणी झाडे घरांवर, वीजवाहिन्यांवर पडल्याने नुकसान झाले. गुरूवारी सकाळी 8 वा. पर्यंत वेंगुर्ले तालुक्यात सर्वाधिक 129 मि.मी. पावसाची नोंद झाली, तर दोडामार्ग तालुक्यात 113 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 1503 मि.मी. पाऊस झाला आहे. 

माणगाव खोर्‍यात पूरस्थिती

पावसामुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोर्‍यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कर्ली नदीला महापूर आल्याने कुडाळ-माणगाव मार्गावरील आंबेरी पूल पाण्याखाली गेला असून, खोर्‍यातील 32 गावांचा तालुक्याशी असलेला वाहतूक संपर्क तुटला आहे. यामुळे खोर्‍यातील गावांमध्ये बुधवारी रात्री वस्तीसाठी गेलेल्या एस.टी.च्या गाड्या अडकून पडल्या. परिणामी विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, कामगार यांना गुरुवारी सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. 

 * माणगाव खोर्‍यातील  32 गावांचा संपर्क  तुटला
 * दोडामार्ग तालुक्यातील  अनेक पूल पाण्याखाली
 * मालवण परिसरात  वादळी पावसाने हानी
 * बांदा येथे महामार्ग  दोन तास ठप्प
 * वैभववाडी-गगनबावडा  मार्गावर पाणी