Mon, Sep 16, 2019 12:25होमपेज › Konkan › भाजपचा ‘अच्छे दिन’साठी ; सेनेचा ‘एन्ट्री’चा प्रयत्न

भाजपचा ‘अच्छे दिन’साठी ; सेनेचा ‘एन्ट्री’चा प्रयत्न

Published On: Mar 19 2018 1:47AM | Last Updated: Mar 19 2018 1:38AMगुहागर : प्रतिनिधी

गुहागर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगरपंचायत, पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. गुहागरमधील राष्ट्रवादीची सत्ता काढून घेऊन भाजप ‘अच्छे दिन’ आणण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे शिवसेना या निवडणुकीच्या माध्यमातून नगरपंचायतीत ‘एन्ट्री’ करण्याच्या तयारीने उतरली असल्याचे चित्र आहे.

गुहागर नगरपंचायत निवडणुकीचे पडघम शहरात वाजू लागले आहेत. अर्ज भरण्यात राष्ट्रवादीने आघाडी घेतली, यानंतर भाजपकडून यादी जाहीर झाली. शहर विकास आघाडीही नव्याने या निवडणुकीला सामोरी जात आहे. एकूणच राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजप व शहर विकास आघाडीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नगरपंचायत नव्याने स्थापन झाली तेव्हा आ. भास्कर जाधव नगरविकास मंत्री होते. त्यामुळे गुहागरला झुकते माप देऊन त्यांनी भरघोस निधी आणला. याच निधीच्या जोरावर राष्ट्रवादीने नगरपंचायतीत निर्विवाद सत्ता मिळविली. यानंतर जि. प. व पं. स. निवडणुकीतही राष्ट्रवादीने बाजी मारली. निधीच्या माध्यमातून गुहागरमध्ये विकासकामे झाली. मात्र, काही कामांचा दर्जा निकृष्ट ठरल्याने ही कामे वादग्रस्त ठरली आहेत. 

हाच धागा पकडून भाजप व नव्यानेच स्थापन झालेल्या शहर विकास आघाडीने निवडणूक प्रचार सुरू केला आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. यामुळे गुहागरसाठी भरघोस निधी आणण्याची ग्वाही देत मतदारांना आकर्षित केले जात आहे. कुठल्याही परिस्थितीत गुहागरमध्ये ‘अच्छे दिन’ येण्यासाठी भाजप प्रयत्नशिल आहे. शहर विकास आघाडीशी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत तडजोड होऊ शकते, अशी चर्चा आहे. 

दुसरीकडे शिवसेनेने या निवडणुकीत काही जागांवर उमेदवार उभे केले आहेत. कुठल्याही परिस्थितीत नगरपंचायतीत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणण्यासाठी सेनेकडून वेगळ्या रणनीतीचा पर्याय अवलंबिण्यात येत आहे. घोणसरे येथे शिवसेनेचा निर्धार मेळावा शनिवारी पार पडला. सहा मंत्री यावेळी उपस्थित होते. यापैकी गुहागरमध्ये कोणी आले असते तर त्याचा फायदा निवडणुकीसाठी झाला असता, अशी चर्चा आता सुरू आहे. सेनेचे स्वीकृत नगरसेवक बारटक्के हे आता राष्ट्रवादीत गेले आहेत. 

शहर विकास आघाडीकडून नऊ नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. कुणबी समाजाची मोट बांधत शहर विकास आघाडी या निवडणुकीत राष्ट्रवादीला टक्कर देण्याचा प्रयत्न करणार आहे. एकहाती सत्ता घेण्याकडे शहर विकास आघाडीचा कल असल्याचे चित्र आहे. यातच कमी मतदारसंख्येचे प्रभाग असल्याने निवडणूक येणारा उमेदवार थोड्याफार फरकानेच निवडून येणार आहे.  या वेळच्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला भाजप, सेना व शहर विकास आघाडीशी टक्कर द्यावी लागणार आहे.