Thu, Nov 15, 2018 11:21होमपेज › Konkan › जमिनींच्या हद्दीवरुन यापुढे डोकी फुटणार नाहीत

जमिनींच्या हद्दीवरुन यापुढे डोकी फुटणार नाहीत

Published On: Nov 08 2018 1:26AM | Last Updated: Nov 08 2018 1:26AMरत्नागिरी : पुढारी ऑनलाईन

ग्रामीण भागात असो की भावाभावात जमिनीच्या हद्दीवरुन होणारे वाद यापुढे होऊ नये, यासाठी राज्य शासनाने पावले उचलले आहेत. जमिनींची मोजणी अगदी काटेकोर होण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या वतीने ‘गगन’ या उपग्रहाची मदत घेतली जाणार आहे. उपग्रहाच्या माध्यमातून अक्षांश आणि रेखांश निश्‍चित केले जाणार आहे. यासाठी राज्यात प्रत्येक भूमापन क्रमांकाच्या हद्दीवर ‘जीपीएस स्टोन’ बसविण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनीची मोजणी व पोटहिस्से करणे शक्य होणार आहे. कोकण विभागात रायगड जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने राज्यातील जमिनींची पुनर्मोजणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शंभर वर्षानंतर राज्यात प्रथमच जमिनींची मोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा महसूल विभागांमध्ये प्रत्येकी एका जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. कोकण विभागात रायगड जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. राज्यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती जिल्ह्यांमध्ये अक्षांश व रेखांश पध्दतीने मोजणी केली जाणार आहे. हद्द मोजणी झाल्यानंतर  त्या ठिकाणी ‘जीपीएस स्टोन’ बसविण्यात येणार आहेत. सॅटेलाईट इमेज मॅच करुन मोजणी निश्‍चित केली जाणार आहे. प्रत्येक सर्व्हे नंबरचा अक्षांश-रेखांश निश्‍चित झाल्यानंतर जीपीएस रीडिंग आणि गगन या उपग्रहांच्या माध्यमातून जमिनीची अचूक मोजणी करणे शक्य होणार आहे.

दरम्यान, मोजणी झाल्यानंतर जमिनीचे स्थान, त्यांची दिशा आणि सीमा निश्‍चित होऊन नेमकी जमीन कोठे आहे. क्षेत्रफळ किती आहे ही सर्व माहिती संगणकावर समजणार आहे. सध्या पारंपरिक पध्दतीने खुणा करुन मोजणी केली जाते. काही काळानंतर या खाणाखुणा नष्ट होतात व त्यातून जमिनीवरुन वाद होतात. एकमेकांच्या हद्दीत घुसविल्या जातात. जीपीएस यंत्रणेमुळे ग्रामीण भागातील जमिनीच्या हद्दिवरुन होणारी भांडणे मिटणे शक्य होणार आहे.