होमपेज › Konkan › दुही माजवल्यास मच्छीमारच उत्तर देतील!

दुही माजवल्यास मच्छीमारच उत्तर देतील!

Published On: Mar 26 2019 1:35AM | Last Updated: Mar 25 2019 10:26PM
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

पारंपारिक मच्छीमार हा आमचा आधार आहे. तो आमचा प्राण आहे. त्यामुळे या पारंपारिक मच्छीमाराला केंद्रबिंदू मानून गेल्या पाच वर्षांत केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून खूप चांगले निर्णय घेतले आहेत. हा पारंपारिक मच्छीमार आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन त्याचे जीवन स्थिर व्हावे यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आता केवळ त्यांच्या मतांवर डोळा ठेवून जर कुणी  सेना-भाजपा युती आणि मच्छीमार यांच्यात दुही माजविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला येथील पारंपारिक मच्छीमार योग्य ते उत्तर देतील  असा विश्‍वास खा. विनायक राऊत यांनी व्यक्‍त केला. शिवसेना आणि मच्छिमार हे वेगळे नाहीच ते नेहमी एकच असतात असा टोला स्वाभिमान पक्षाला उद्देशून लगावला.

सिंधुदुर्गनगरी येथे आपल्या संपर्क कार्यालयात खा. राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. आपण महायुतीचा उमेदवार म्हणून 30 मार्च रोजी सकाळी 11 वा. उमेदवारी दाखल करणार आहे. या निवडणुकीत शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप या सर्व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले. यावेळी  आ. वैभव नाईक, नागेंद्र परब, हरी खोबरेकर उपस्थित होते. 

सर्व पारंपरिक ममच्छीमार आमचे दैवत आहे. ते आमचे आधार आहेत. पारंपारिक मच्छिमारांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या मच्छीमारांना आर्थिक स्थिरता यावी, यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ‘चांदा ते बांदा’ योजनेतून अनुदानित तत्वावर अनेक योजना राबविल्या. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार युतीच्या उमेदवारासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने सोशल मिडियावर चुकीचा मेसेज फिरवून आमच्यात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, पारंपरिक मच्छीमारच या निवडणुकीत त्यांना धडा शिकवतील.

खा राऊत यांनी, आम्ही कधीच पारंपरिक मच्छीमार कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार केला नाही. मच्छीमारीची पॉलिसी ठरण्यासाठी आपण व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मिळून प्रयत्न केला.त्या प्रयत्नांना स्थानिक मच्छीमार नेत्यांचेही चांगले सहकार्य लाभले. त्यामुळे या विभागाचे स्वतंत्र मंत्रालय निर्माण झाले. स्वतंत्र मंत्री असावा, अशीही आमची आग्रही मागणी आहे. रत्नागिरी येथील काही पर्सनेट मच्छीमारी करणारे आपल्याला भेटायला आले होते. त्यांना पर्सनेट मच्छिमारी कालावधी दोन महिने वाढवून मे महिन्यापर्यंत हवा होता. त्यासाठी मी त्यांना घेऊन केंद्रीय कृषीमंत्र्यांना भेटलो. त्यावेळी मी एलईडी मासेमारीला विरोध दर्शवित या प्रकारची मासेमारी करणार्‍यांवर फौजदारी करा. 3 वर्षांची शिक्षा होईल, असा कायदा करा अशी मागणी केली होती. मात्र, याबाबतचा फ़ोटो व्हायरल करीत स्वाभिमान पक्ष आमच्यात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.

नीलेश राणे अपक्ष उमेदवार असणार...

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नीलेश राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, निलेश राणे हे अपक्ष उमेदवार म्हणून गणले जाणार आहेत, असा खळबळजनक दावा युतीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांनी केला.

नीलेश राणे यांना आपले डिपॉझिट जप्त होणार, अशी भीती वाटू लागल्याने ते मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा वेडावाकडा प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो टाकत पारंपरिक मच्छिमारांचे मन कलूषित होईल, माझ्या विरोधात पारंपरिक मच्छिमार जातील, असा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. 

काँग्रेसने भंडारी समाजाला उमेदवारी जाहीर केली असली तरी शिवसेना व भाजप पक्षात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. त्यामुळे माझ्या मतावर त्याचा परिणाम होणार नाही. तसेच आरपीआयचे नवीन अध्यक्ष व कार्यकारिणी आपल्या सोबत आहे, असेही  खा. राऊत यांनी सांगितले. 

ते आमच्यावर 420 गिरी काय दाखल करणार ?

या निवडणुकीत ‘विकास’ हाच आमचा मुद्दा आहे. भाजप सोबत असलेले मतभेद कोल्हापूर येथील बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केले आहेत. उद्या पुन्हा मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत, असे यावेळी खा राऊत म्हणाले. तसेच ज्यांनी आयुष्यभर ‘420 गिरी’ केली. ते माझ्यावर काय 420 दाखल करणार? असा खोचक प्रश्‍न बीएसएनएल टॉवर प्रश्‍नावरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला यावेळी खा. राऊत यांनी विचारला. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex