Mon, Jul 06, 2020 04:22होमपेज › Konkan › ... तर मच्छीमारांचा मतदानावर बहिष्कार

... तर मच्छीमारांचा मतदानावर बहिष्कार

Published On: Mar 14 2019 2:04AM | Last Updated: Mar 13 2019 11:10PM
दापोली : प्रतिनिधी

संपूर्ण कोकण किनारपट्टीलगतच्या सर्व मच्छीमार बांधवानी एल.ई.डी फिशिंगच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने जर लवकरात लवकर या अवैध मासेमारीच्या विरोधात कारवाई केली नाही तर मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंतचा सर्व पारंपरिक मच्छीमार येत्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे येथील मच्छीमारांनी सांगितले.

येत्या दोन दिवसांत या विषयावर हर्णै बंदरात महासभा होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एल.ई.डी फिशिंग व पारंपरिक मच्छीमार यांच्यात मोठा संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दोन दिवसांपूर्वी गुहागरमध्ये हर्णै, दाभोळ, गुहागर येथील मच्छीमार बांधवानी एक एलईडी फिशिंग करणारी नौका फिशरीजच्या अधिकार्‍यांना पकडून दिली. या नौकेवर फिशरीज अधिकार्‍यांकडून  पंचनामा होऊन कारवाई झाली. तरीही अजून शासनाचे डोळे उघडत नाहीत. एलईडी मासेमारीच्या विरोधात संपूर्ण किनारपट्टीला रान पेटलं आहे. या मासेमारीवर केंद्र व राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे पूर्णपणे बंदी असूनदेखील राजरोसपणे ही मासेमारी चालत आहे. याच्याच विरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पारंपरिक मच्छीमारांनी 26 जानेवारीला या मासेमारी विरोधात उपोषण केले होते. या उपोषणात जिल्ह्यातील बहुतांश मच्छीमार सामील झाले होते.

एलईडी फिशिंगमुळे संपूर्ण मासळी समुद्रातून गायब होण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या हर्णै बंदरात मासळीची आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. त्यामुळे एका नौकेवर आठ किंवा चार दिवसांकरिता फिशिंगकरिता लागणारे साहित्य, नोकरवर्ग यांचा लाखो रुपयांचा खर्च नौकामालकाच्या अंगावरच पडत आहे. अशा पद्धतीत सुद्धा बंदरात हजारो नौका आपला उद्योग करीत आहेत. यात नौकामालकाचे अक्षरशः कंबरडे मोडत आहे. अशा या कठीण परिस्थितीत पुन्हा या उद्योगात मच्छीमारांना ठामपणे उभे राहणे कठीण होऊन बसले आहे. 

या एलईडी फिशिंगच्या विरोधात अनेकवेळा आंदोलने, मोर्चे, सभा घेऊन संबंधित मंत्र्यांपर्यंत निवेदनाद्वारे विषय मांडण्यात आला आहे. तरी देखील काहीच दाद लागत नाही. राजकीय पाठिंबा असल्यामुळेच एलईडी फिशिंग बिनधास्तपणे सुरू आहे. यामुळे सर्व किनारपट्टीलगत असणारा पारंपरिक मच्छीमार उद्ध्वस्त होणार आहे. याला संपूर्ण शासनच जबाबदार राहणार आहे, असा आरोप येथील मच्छीमारांनी केला आहे. 

आता ही मासेमारी कायमची बंद झालीच पाहिजे नाहीतर येऊ घातलेल्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा मासेमारांनी घेतला आहे.

एलईडी फिशिंगमुळे किनारपट्टीलगतचा पारंपरिक मच्छीमार मेटाकुटीस आला आहे. शासनाकडे अनेक वेळा दाद मागून शासन लक्ष देत नाही. दोन दिवसांपूर्वी आम्ही मच्छीमारांनीच एक एलईडी फिशिंग करणारी नौका फिशरीज अधिकार्‍यांना पकडून दिली.  असे हे राजरोसपणे सुरू असल्यामुळे आम्हा मच्छीमारांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घ्यावा लागत आहे.
प्रकाश रघुवीर, उपसरपंच-हर्णै