Tue, Sep 17, 2019 03:38होमपेज › Konkan › जिल्ह्याचा १८ कोटींचा पाणीटंचाई आराखडा

जिल्ह्याचा १८ कोटींचा पाणीटंचाई आराखडा

Published On: Mar 07 2019 2:02AM | Last Updated: Mar 06 2019 10:40PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात कोसळूनही उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. रत्नागिरी जिल्ह्यात टंचाईची झळ कमी बसावी, यासाठी जिल्हा परिषदेकडून १८ कोटी १५ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याला जिल्हाधिकार्‍यांची मान्यताही मिळाली आहे. 

जिल्हा परिषदेकडून तयार केलेला आराखडा जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्यातील कामे हाती घेण्यात येत आहेत. लोकसभा निवडणूक असल्यामुळे पाणी योजनेच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन पाच कोटींच्या कामांना आधीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. निविदा प्रक्रियेनंतर तत्काळ वर्कऑर्डर घेतली जाईल. ही कामे लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी यांनी स्थायी व जलव्यवस्थापन समितीत दिले होते. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून प्रथमच 18 कोटींपेक्षा अधिकचा टंचाई आराखडा तयार केला होता. त्यात सर्वाधिक कामे जिल्ह्यातील नळपाणी योजनांच्या दुरुस्तींची आहेत. संभाव्य आराखड्यात 905 वाड्यांमध्ये टंचाईचा परिणाम जाणवू शकतो. पाणी योजनांची दुरुस्ती केल्यास त्यातील अनेक गावांना मे महिन्यापर्यंत पाणी पुरवणे शक्य आहे. योजनांची दुरुस्ती करणे, धरणातील साठा वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यावर यामध्ये भर दिला गेला आहे. 

प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे पुढील कार्यवाही लवकर करणे प्रशासनाला शक्य होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये टंचाई आराखड्यातील कामांना अडथळे निर्माण होणार नाहीत.  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex