होमपेज › Konkan › जिल्ह्याचे टार्गेट पूर्ण

जिल्ह्याचे टार्गेट पूर्ण

Published On: May 18 2019 1:44AM | Last Updated: May 18 2019 1:44AM
चिपळूण : समीर जाधव

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात हागणदारीमुक्‍त गाव करण्यात प्रशासनाला यश आले असून 2012 पासून आतापर्यंत 89 हजार 250 वैयक्‍तिक शौचालये बांधण्यात यश आले आहे. या कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांना शासकीय अनुदान प्राप्‍त झाले आहे. मात्र, अजूनही सार्वजनिक शौचालयांचा वापर होत असल्याने ही योजना अजूनही पूर्णत्वास गेलेली नाही.

सन 2012 मध्ये शासनाने निर्मल भारत अभियान या नावाने योजना आणली. त्यानंतरच्या काळात स्वच्छ भारत मिशन असे नाव झाले. ग्रामीण पातळीवर या योजनेंतर्गत हागणदारीमुक्‍त गाव अशी योजना आली. निर्मल ग्रामपंचायत, निर्मल पंचायत समिती करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. 90 टक्के लोकांनी वैयक्‍तिक शौचालये बांधल्यास तो तालुका निर्मल घोषित होऊ लागला. आता 2012 पासून 2019 पर्यंतच्या कालावधीत संपूर्ण रत्नागिरी जिल्हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निर्मल झाला असून सार्वजनिक शौचालयांचा प्रश्‍न फक्‍त शिल्लक राहिला आहे. या पुढील टप्प्यात जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष तसेच स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत वैयक्‍तिक शौचालये बांधण्यावर भर देण्यात येणार आहे. 

रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता वैयक्‍तिक शौचालय बांधण्यासाठी सन 2012 मध्ये 97 हजार 865चे उद्दीष्ट देण्यात आले होते. मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात 89 हजार 250 वैयक्‍तिक शौचालये बांधून पूर्ण झाली होती. त्यातील 61 हजार 320 लाभार्थ्यांना शासकीय अनुदान देखील वितरित करण्यात आले आहे. पंचायत समिती स्तरावर 16 हजार 550 लोकांना अनुदान वितरित झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 19 कोटी 86 लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. 

जिल्ह्याचा विचार करता मंडणगडसाठी 5487 एवढे उद्दीष्ट होते. त्यापैकी 4,934 वैयक्‍तिक शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. या ठिकाणी 4 कोटी 32 लाख 57 हजार रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. दापोलीसाठी 14,021 पैकी 12,413 उद्दीष्ट होते. या ठिकाणी आत्तापर्यंत 11 कोटींचे अनुदान वितरित झाले आहे. खेडमध्ये 10,183 चे उद्दीष्ट होते. त्यापैकी 9,385 उद्दीष्ट पूर्ण झाले असून 9 कोटी 88 लाखांचे अनुदान वितरित झाले आहे. 

चिपळूणसाठी सर्वाधिक 18,865 इतके उद्दीष्ट होते. त्यापैकी 17,531 उद्दीष्ट पूर्ण झाले असून 18 कोटी 23 लाखांचे अनुदान वितरित झाले आहे. गुहागरसाठी 9,127चे उद्दीष्ट होते. पैकी 7,886 उद्दीष्ट गाठले असून यासाठी 7 कोटींचे अनुदान वितरित झाले आहे. संगमेश्‍वर तालुक्यासाठी 7,467 इतके उद्दीष्ट होते. पैकी 7284 उद्दीष्ट पूर्ण झाले असून 7 कोटी 49 लाखांचे अनुदान वितरित झाले आहे. रत्नागिरीसाठी 13 हजार 341 चे उद्दीष्ट होते. त्यापैकी 11,880 उद्दीष्ट पूर्ण झाले असून 11 कोटी 8 लाखांचे अनुदान वितरित झाले आहे. लांजासाठी 5,616 उद्दीष्टांपैकी 5,610 इतके उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. या ठिकाणी 6 कोटी 13 लाखांचे अनुदान वितरित झाले आहे. राजापूर तालुक्यासाठी 13,658 शौचालयांचे उद्दीष्ट होते. त्यापैकी 12,427 शौचालये बांधून पूर्ण झाली असून या ठिकाणी 12 कोटी 75 लाख रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अत्यंत तुरळक प्रमाणात वैयक्‍तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता या पुढच्या काळात सार्वजनिक शौचालयातून लोकांना वैयक्‍तिक शौचालये बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे.