Wed, Apr 01, 2020 14:22होमपेज › Konkan › रत्नागिरी तालुक्यात तीन गावांचा विलग राहण्याचा निर्णय

रत्नागिरी तालुक्यात तीन गावांचा विलग राहण्याचा निर्णय

Last Updated: Mar 25 2020 10:01PM
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशासह महाराष्ट्रातही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू, जमावबंदीपाठोपाठ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही अनेक नागरिक दुचाकी घेऊन बाहेर पडत आहेत. मात्र, आता कोरोना रोखण्यासाठी ग्रामीण भाग सरसावला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पानवल, वरवडे, कारवांचीवाडीतील धनावडेवाडी यांनी लोकांना बाहेर जाण्यास बाहेरच्या लोकांना गावात येण्यास बंदी घातली आहे. या गावांतील ग्रामस्थांनी स्वतःला अलग करून घेतले आहे

कोरोनामध्ये एकीकडे संचारबंदी असतानाही शहरी भागामध्ये नियम तोडून नागरिक सर्वत्र फिरत आहेत त्यावेळी ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी सुज्ञ निर्णय घेतला आहे.

राजापूर तालुक्यातील पाचलपाठोपाठ रत्नागिरी तालुक्यातील पानवल, वरवडे, कारवांचीवाडी, धनावडे वाडी गावानेही स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे.  वरवडे गावातून सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. तेथे बाहेरून येणार्‍या आणि बाहेर जाण्यास वाहनांना पूर्ण बंदी घातली आहे  आहे. वरवडेच्या आपत्तीविरोधी व गाव  दक्षता समितीचा निर्णय गावाने ही मान्य केला आहे.  या परिस्थितीत समितीचे आणि गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रत्येक नाक्यावर उपस्थित राहून ग्रामस्थांना सूचना करीत आहेत. गावात बाहेरून आलेल्या लोकांचा सर्व्हे आणि तपासणी सुरू करण्यात आली आहे.  रत्नागिरीत महामार्गाला लागून असणार्‍या पानवल गावाचा फाट्यावरच बंदीचा बोर्ड झळकत आहे. गावच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे