Mon, Jul 13, 2020 11:22होमपेज › Konkan › परतीच्या पावसामुळे कुडाळ तालुक्यात  पिकाचे नुकसान

परतीच्या पावसामुळे कुडाळ तालुक्यात  पिकाचे नुकसान

Last Updated: Oct 09 2019 10:51PM
कुडाळ : शहर वार्ताहर 

कुडाळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांत कोसळलेल्या पावसाने  हाता तोंडाशी आलेल्या भातपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे भातपिक कुजून आधीच मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकर्‍यांना मिळालेली नसतांना आता पुन्हा  परतीच्या पावसाने पिकलेल्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात भातशेती कुजली होती. त्यावेळी तालुक्यातील भातपिकाचे 4,820 शेतकर्‍यांचे 3642.20 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता. पुरापासून वाचलेली शेती किमान उत्पन्‍न देईल, अशी आशा शेतकर्‍याला होती. तालुक्यात सर्वत्र भात कापणी योग्य बनले असून काही ठिकाणी हळव्या भातशेतीची कापणीही सुरू झाली आहे. मात्र, गेले दोन दिवस तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळला. या पावसाने पिकलेले उभे भातपीक जमिनीवर आडवे झाले. शिवाय कापणी केलेले भातही भिजले.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जमिनीवर पडलेले भात पाण्यात कुजून जाणार आहे. शिवाय त्याला कोंबही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा  शेतकर्‍यांना भाताच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.कोकणात भातपीक हे प्रमुख पीक आहे. या पिकावरच  येथील शेतकरी कुटुंबे आपला उदरनिर्वाह करतात. ऑगस्ट महिन्यात पूरस्थितीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचा कृषी विभागाने पंचनामा करून त्याचा अहवाल शासनस्तरावर पाठवला होता.

दरम्यान, पूरबाधितांना शासनाकडून तातडीची नुकसान भरपाई मिळाली मात्र नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अद्याप शेतीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतीतून पिकलेले तांदुळ वर्षभर पुरविले जातात मात्र हिच भातशेती ऑगस्ट महिन्यात पुराच्या पाण्याने कुजून तर आता पावसाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाली. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पावशी, वेताळ बांबर्डे, मुळदे, डिगस, पणदूर, माणगाव, हुमरमळा आदींसह तालुक्यात ठिकठिकाणी भातशेती पावसाने जमिदोनस्त झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

कृषी विभागाने नुकसानीचा सर्व्हे करून शासनाकडून वेळीच नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहे. रात्रभर वीज गडगडाटासह पाऊस गेले दोन दिवस तालुक्यात दुपारचा वीज गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. शिवाय मंगळवारी रात्री दोन ते तीन तास मोठ्या प्रमाणात गडगडाटात सुरू होता. यामुळे वीज, दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली होती.