होमपेज › Konkan › गैरव्यवहारप्रकरणी बँक अधिकार्‍यांवर गुन्हा

गैरव्यवहारप्रकरणी बँक अधिकार्‍यांवर गुन्हा

Published On: Sep 11 2018 1:37AM | Last Updated: Sep 10 2018 10:57PMखेड : प्रतिनिधी

बँक ऑफ इंडियाच्या खेड तालुक्यातील खवटी शाखेतून काजू प्रक्रिया उद्योगासाठी तारण कर्ज घेतलेल्या पायरे दाम्पत्याची मालमत्ता बँक अधिकार्‍यांनीच परस्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये सुमारे 13 लाखांच्या वस्तूंची विक्री केल्याप्रकरणी खेड न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बँक ऑफ इंडियाच्या अधिकार्‍यांसह  अन्य काही जणांवर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत तक्रारदार मयूर पायरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे चिंचघर प्रभूवाडी येथील त्यांची सदनिका त्यांनी बँक ऑफ इंडिया खवटी शाखेकडे सन 2006 मध्ये 10 लाख रुपये कर्ज मिळण्यासाठी तारण दिली होती. कर्जाची नियमित परतफेड करत असतानाच त्यांनी सन 2011मध्ये मयूर व वर्षा पायरे यांनी जमीन औद्योगिक बिनशेती करून घराच्या तळमजल्यावर शेडमध्ये काजू प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी बँकेकडे तारण कर्जापोटी 23 लाख 27 हजार 500 रुपये कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बँकेने सन 2011 मध्ये कर्ज प्रकरण मंजूर केले. परंतु, प्रत्यक्ष कर्जाच्या रकमेचा पुरवठा पायरे कुटुंबाला बँकेकडून नियमित करण्यात आला नाही. 

बँकेने सुरुवातीला 5 लाख पायरे यांना यंत्र व कच्चा माल विकत घेण्यासाठी व शेड उभारणीसाठी दिले. बँकेकडून मंजूर 23 लाख 27 हजार 500 रूपये कर्जामध्ये बँकेला 8 लाख 57 हजार 500 रूपये एवढी सबसिडीदेखील मिळाली होती. परंतु, बँक ऑफ इंडिया खवटी शाखेच्या निष्काळजीपणामुळे उद्योगामध्ये नुकसान झाले व कर्जाचे हप्‍ते थकले. बँकेकडे पत्रव्यवहार करून पैसे भरण्याची तयारी दाखवली. परंतु, बँकेने कर्जफेडीसाठी पायरे दाम्पत्याला नियमित हप्ते लावून दिले नाहीत. बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक, बँक ऑफ इंडियाचे अधिकृत अधिकारी सुदीप नियोगी, विभागीय व्यवस्थापक रामधन कुंभार व खवटी शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी अविनाश अडसर यांनी त्यांना सहकार्य न करता दि. 2 एप्रिल 2016 रोजी पायरे कुटुंबाची तारण मालमत्ता लिलाव प्रक्रियेद्वारे विक्री करण्याची लेखी सूचना दिली. 

या सूचनेलादेखील पायरे कुटुंबीयांनी दि.4 मे 2016 रोजी उत्तर देताना पैसे भरण्याची तयारी दाखवली. त्यांच्या मालमत्तेची किंमत सुमारे 1 कोटी रूपये असल्याने लिलाव करून ती विक्री करू नये, अशी विनंती केली. मात्र, त्या पत्राला उत्तर न देताच बँकेच्या संबंधित अधिकार्‍यांनी पायरे कुटुंबाकडून कायदेशीर प्रत्यक्ष ताबा न घेताच स्थावर मालमत्ता गजेंद्र विठ्ठलदास खेडेकर यांना लिलाव करुन विकली. त्यानंतर खेडेकर व बँक अधिकार्‍यांनी पायरे यांच्या तारण मालमत्तेतील सुमारे 25 ते 30 लाख रूपये किमतीचे साहित्य चोरले,  असे तक्रारीत म्हटले आहे.

खेड पोलिस ठाण्यात सातत्याने तक्रार करून व लोकशाही मार्गाने तीन वेळा उपोषण करूनदेखील पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे मयूर पायरे यांनी दि.16 ऑगस्ट 2018 रोजी खेड न्यायालयात तक्रार अर्ज केला व खोटी कागदपत्रे तयार करून बँकेने खरेदीखताने बेकायदेशीररित्या गजेंद्र खेडेकर यांना मालमत्ता विकल्यानंतर त्याने घरातील पैसे, दागिने, यंत्र आदींची चोरी करून घराची तोडफोड केल्या प्रकरणी पोलिस तपास व्हावा व दोषींवर कारवाई व्हावी, अशी विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने सीआरपीसी 156(3) प्रमाणे खेड पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. 

क्षेत्रीय प्रबंधकही अडकले

लिलाव घेणारे गजेंद्र विठ्ठलदास खेडेकर, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक सुदीप नियोगी, विभागीय व्यवस्थापक रामधन कुंभार, तत्कालीन खवटी शाखा अधिकारी अविनाश अडसर, खवटी शाखेतील शिपाई अनंत दादोबा दळवी आदींसह अन्य एका बँक व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.