Tue, Sep 17, 2019 04:51होमपेज › Konkan › आचारसंहिता शिथिल : टंचाई आराखड्यातील सर्व २०८ कामांना मंजुरी

आचारसंहिता शिथिल : टंचाई आराखड्यातील सर्व २०८ कामांना मंजुरी

Published On: May 07 2019 1:59AM | Last Updated: May 06 2019 10:51PM
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

निवडणूक आचारसंहितेच्या कारणास्तव रखडलेल्या टंचाईअंतर्गत 208 कामांना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मंजुरी दिली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार निवडणूक आयोगाने टंचाई कामांसाठी शिथिलता दिल्यानंतर ही मंजुरीची कार्यवाही करण्यात आली. यामुळे  तहानलेल्या गावांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, पावसाळा तोंडावर आल्याने ही कामे पूर्ण होणार कधी?  व नागरिकांना पाणी मिळणार कधी? असा सवाल होत आहे. या कामांमध्ये नळ पाणीपुरवठा दुरुस्तीच्या 83 कामांचाही समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठीचा पाणीटंचाईचा एकूण 208 कामांचा आराखडा तयार करून हा जिल्हा परिषदेने तो जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी पाठविला होता. मात्र, हा पाणीटंचाई आराखडा आचारसंहितेच्या कात्रीत अडकला होता. परिणामी जिल्ह्यात पाणीटंचाई समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत होता.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याने पाणीटंचाई कामांसाठी आचारसंहिता शिथिल व्हावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. ही विनंती मान्य करत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात टंचाई अंतर्गत कामे करण्यासाठी आचारसंहिता शिथिल केली आहे. याचा लाभ पाणीटंचाईग्रस्त गावांना झाला आहे. यानुसार जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आलेल्या 208 ही कामांना  सोमवारी  जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी प्रशासकीय मंजुरी दिली. 

पाणीटंचाईच्या मंजूर झालेल्या कामांमध्ये नवीन विंधन विहिरी 50, विंधन विहीर दुरुस्ती, 40 विहीर खोल करणे, गाळ काढणे 33 कामे, नळ पाणीपुरवठा दुरुस्ती 83, तर तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा योजना 2 अशा एकूण 208 कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

तर, पाणीटंचाई निवारणासाठी आतापर्यंत 381 वाड्यांचे सर्वेेक्षण करण्यात आले आहे.  त्या नंतर 317 कामांचे प्रपत्र ‘ब’ प्राप्त झाले, त्यापैकी पुरेसे पाणी नाही, जागा योग्य नाही अशी 13 कामे रद्द करण्यात आली आहेत. त्यानंतर सर्व आवश्यक त्याबाबी तपासून 275 एवढी अंदाजपत्रके तयार करण्यात आली होती. त्यापैकी 208 प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्व प्रस्तावांना जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

15 मे पर्यंत मुदतवाढ

नळपाणी पुरवठा दुरुस्ती कामांच्या मंजुरीसाठी 31 मार्च ही अंतिम मुदत होती त्याला शासनाने आता 15 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या कामांना गती येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार गावे व 513 वाड्यांसाठी मिळून सहा कोटी 44 लाख रु. खर्चाच्या  टंचाई आराखड्याला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex