Sat, Jul 04, 2020 10:36होमपेज › Konkan › भाताच्या १६ जातींची पैदास; १२ वाणांची शिफारस

भाताच्या १६ जातींची पैदास; १२ वाणांची शिफारस

Last Updated: Jul 02 2020 7:57AM
रत्नागिरी : विशाल मोरे

मागील 20 वषार्र्ंत भाताच्या 16 नव्या जातींची पैदास, भुईमुगावर संशोधन करून कोकणासाठी उपयुक्त अशा नव्या जातीचा शोध तसेच 12 नव्या जातींची शिफारस, या शिवाय नाचणीच्या नव्या जातीवरही संशोधन करून शेतीत बहुमूल्य योगदान देणारे शिरगाव येथील भात संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांनी आपल्या कार्याचा ठसा केवळ कोकणच नव्हे तर राज्य, राष्ट्रीय आणि अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटवला आहे. भात शेतीतील त्यांचे संशोधन शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत आहे.

बीड जिल्ह्यातील नेकनूर या गावी त्यांचा जन्म झाला. रोज पाच कि.मी.ची पायपीट करत त्यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती हलाखीची असताना सुट्टीच्या दिवसात काम करून त्यांनी शाळेसाठी पैसे जमवले. सातव्या इयत्तेत शिष्यवृत्ती स्पर्धेत विभागात ते तिसरे आले होते. त्यावेळी मिळणार्‍या 300 रुपयांच्या शिष्यवृत्तीचा त्यांना मोठा आधार होता. त्यांचा मोठा भाऊ डीएडचे शिक्षण घेत होता. साहजिकच त्यांनीही डीएड करावे अशी घरच्यांची इच्छा होती. 

पण आपल्या लहान भावाने पुढे शिकावे यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. यातून मग त्यांनी बलभीम कॉलेजला 11 वी सायन्सला अ‍ॅडमिशन घेतले. येथे 12 वीचे शिक्षण पूर्ण केल्यावर लातूरच्या कृषी महाविद्यालयातून बीएसस्सी अ‍ॅग्रीचे शिक्षण पूर्ण केले. राहुरी कृषी विद्यापीठात एमएसस्सी पूर्ण केल्यावर तेथेच डॉ. जांभळे यांच्या बायोटेक्नॉलॉजी रिसर्च लॅबमध्ये नोकरी मिळाली. भाभा ऑटो रिसर्च सेंटरचा केळीचे टिश्यू कल्चर बनवण्याच्या प्रोजेक्टवर येथे काम सुरू होते. तेथे दोन वर्षे त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभले. येथे त्यांनी एक लाख रोपे तयार केली. 

सन 2000 साली कोकण कृषी विद्यापीठाची जाहिरात निघाली. 22 जणांमधून त्यांची प्रादेशिक भात संशोधन केंद्र कर्जत येथे कनिष्ठ भात पैदासकार म्हणून नियुक्ती करण्यात आली. भातपिक हे त्यांच्यासाठी नवीन होते. मात्र, तीन महिन्यातच याचा सखोल अभ्यास करून या पिकाचे बारकावे त्यांनी हेरले. या केंद्रात सह्याद्री सिरीजच्या एक काडी संकरित भातावर संशोधन सुरू होते. भाताची उत्पादकता वाढवण्यासाठी हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला होता. डॉ. देशपांडे यांच्या बरोबर त्यांनी सह्याद्री 1 ही जात विकसित केली. डॉ. दळवी यांच्यासोबत सह्याद्री 2, 3 आणि 4 ही जात रजिस्टर केली. सह्याद्री 5 ही एक काडीची जात विकसित केली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोकण कृषी विद्यापीठाने त्यांचा सन 2006 साली दांडेकर पुरस्कार देऊन सन्मान केला.

संशोधनात प्रगल्भता वाढवण्यासाठी त्यांनी देश आणि परदेशातील सेमिनारमध्ये सहभाग घेतला. हैदराबाद, कटक आणि दिल्ली येथे जाऊन प्रशिक्षण घेतले. विविध राज्यात जाऊन तेथील भातशेतीचा अभ्यास केला. सन 2006 साली इटली येथे झालेल्या इंडो युरोपियन राईस कमिशनमध्ये सहभाग घेतला. दरम्यानच्या कालावधीत कर्जत 5, 6, 7, 8, 9, 10 हे भाताचे नवे वाण विकसित करण्यात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून मोलाचे योगदान दिले.

सन 2010 सालापासून त्यांची शिरगाव येथील भात संशोधन केंद्रात वरिष्ठ सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली. येथे संशोधनाबरोबरच आस्थापना आणि लेखापालाची जबाबदारीही पेलताना दोन वर्षातच त्यांनी रत्नागिरी 5 हा नवीन वाण विकसित केला. एक जात विकसित करायची असेल तर त्यासाठी 14 वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात संशोधन करून त्यांनी हा कालावधी 7 वर्षावर आणला. 10 वर्षे येथे घेत असलेल्या मेहनतीला आज यश मिळत आहे. त्यांनी लाल भाताची रत्नागिरी 7 ही जात विकसित केली. सुवर्णा व मसुरी जातीला रत्नागिरी 8 या जातीचा पर्याय तयार केला. 

रत्नागिरी 8 या जातीला देशातील 6 राज्यांची शिफारस मिळाली आहे. याबरोबरच हेक्टरमध्ये 25 ते 30 क्विंटल उत्पादन मिळणार्‍या कोकण भूरत्न या भूईमुगाची जातही विकसित केली. आणखी तीन जातींवर संशोधन सुरू आहे.