Fri, Jun 05, 2020 02:01होमपेज › Konkan › भवानगड मोजतोय अखेरची घटका

भवानगड मोजतोय अखेरची घटका

Published On: May 17 2019 1:46AM | Last Updated: May 17 2019 1:46AM
देवरूख : सागर मुळ्ये 

छत्रपती शिवाजी महाराज कोकण  भेटीला ज्या-ज्या वेळी येत असत त्या-त्या वेळी भवानगडावरील भवानी मातेचे दर्शन घेत असत. या गडावर महाराज विश्रांतीदेखील घेत असत. संगमेश्‍वर तालुक्यातील सर्वात लहान असलेल्या या भवानगडाला पर्यटनाचा ‘क’ दर्जा मिळूनही शासनाच्या अनास्थेमुळे हा गड आज शेवटची घटका मोजत आहे. 

छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला भवानगड सह्याद्री पर्वत रागांत आहे. या गडावर भवानीमातेचे मंदिर असल्यामुळे या गडाला भवानगड असे नाव देण्यात आल्याचे इतिहासकार सांगतात. मुंबई - गोवा महामार्गावरील व संगमेश्‍वर तालुक्यातील गोळवली टप्पा गावाजवळ असलेल्या गडाकडे या गावातून जाण्यासाठी पायी चालत जायला 1 तासाचा कालावधी लागतो. तर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या राजवाडी या गावातून 45 मिनीटांचा वेळ लागतो. तर या गडाकडे जाणारा जवळचा मार्ग म्हणजे तुरळ- कडवई मादगेवाडी मार्गे वहानेही नेता येतात. वाहनाने केवळ 15 मिनीटात गडावर पोहोचता येते.

या गडाचा विस्तार अत्यंत लहान आहे. महाराजांच्या काळात या गडाच्या पायथ्याशी लोकवस्ती होती. याचे काही अंश या गडाकडे जाताना दिसून येतात मात्र त्या लोकवस्ती वा गडावरील वास्तू आज पूर्णपणे जमिनदोस्त झाल्या आहेत. या गडावर महाराज वस्तीला असताना भवानी मातेच्या मूर्ती व नजीकच्या राजवाडी सोमेश्‍वर मंदिरातील शंकराच्या पिंडीवर अभिषेक करीत असत. येथील ग्रामस्थांनी या मंदिराचा काही वर्षापूर्वी जिर्णोध्दार करत मंदिराचे संपूर्ण छप्पर कौलारू केले आहे. या मंदिराचा कायापालट करताना मंदिरातील खांबांना पूर्वीपासून असलेले कोरीव काम व त्यांच्यातील नक्षी अत्यंत सुंदर असल्याने ग्रामस्थांनी जशाच्या तशाच जपून ठेवल्या आहेत. या गडावर एकच अडीच फूट लांबीची तोफ होती. ती अस्ताव्यस्त पडलेली तोफ ग्रामस्थांनी काही वर्षापूर्वी मंदिराजवळ आणून सुरक्षितपणे ठेवली आहे. 

या गडाला त्याच्या क्षेत्रफळानुसार छोटी तटबंदी केलेली होती. आज या तटबंदीकडे दुर्लक्ष केल्याने त्यात मोठमोठी झाडे वाढली असून तटबंदीची पूर्णपणे वाताहात झाली आहे. या गडाच्या बाजूलाच स्वच्छ पाण्याची सोय म्हणून तळे आहे. त्याकाळी पाणी मिळवण्यासाठी गडावरील कातळाचा भाग खोदून वरील बाजूस केवळ पाणी बाहेर काढता येईल एवढीच जागा ठेवण्यात आली आहे. अशाच प्रकारे मोठ मोठ्या खडकात खोदाई केलेली तळी गडावर तीन ठिकाणी पहावयास मिळतात.  या गडावर काही भुयारेही दिसून येतात. याच गडावर पराक पुरीबाबा व पितांबर बाबा यांच्या दोन समाधी दिसून येतात.

निधी तिजोरीत पडून

महाराजांच्या आवडीचा गड गेली अनेक वर्षे पडझडीशी सामना करीत आहे. या गडाला शासनाकडून ‘क’ दर्जाचे पर्यटन क्षेत्र म्हणून दर्जा मिळाला आहे. या गडाच्या परिसर विकासासाठी  लाखो रूपयांच्या निधीची तरतुदही आहे. यातील काही तांत्रिक बाबींची पूर्तता होत नसल्याने हा निधी सरकारी तिजोरीत तसाच पडून आहे. गडाचा विकास होत नसल्याने पर्यटकांचे गडाकडे दुर्लक्ष होत आहे.