Tue, Feb 20, 2018 08:42होमपेज › Konkan › बांद्यात ‘बँक आपल्या दारी’ उपक्रम 

बांद्यात ‘बँक आपल्या दारी’ उपक्रम 

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 15 2018 12:08AMबांदा : प्रतिनिधी

बँक ग्राहकांना बँकेच्या विविध योजनांची माहिती व्हावी, कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे कशी व कोणती पूर्ण करावीत याबाबत माहिती देण्यासाठी बांद्यात बँक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित ‘बँक आपल्या दारी’ कार्यक्रमास ग्राहकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

बँक ऑफ इंडिया बांदा शाखेचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घरंडे यांचे स्वागत ज्येष्ठ व्यापारी दिवाकर नाटेकर यांनी केले. बांदा व्यापारी संघाचे सचिव सचिन नाटेकर यांनी या मेळाव्यात ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्याची मागणी केली. यावेळी कॅश क्रेडिट, शैक्षणिक कर्ज, कृषी कर्ज, होमलोन, कारलोन, गोल्ड लोन आदींची माहिती बँकेच्यावतीने देण्यात आली. सुलभ व त्वरित कर्ज मिळण्यासाठी कोणते नियम व कार्यवाही अवलंबावी याचे मार्गदर्शन केले.

 येथील व्यापार्‍यांना कॅश क्रेडिट कर्ज आणि इतर उद्योग कर्जे मिळविण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यात उद्भवत असलेल्या समस्या काजू व्यापारी भैय्या गोवेकर, सुवर्णकार काका धारगळकर, साईराज साळगांवकर, प्रवीण नाटेकर यांनी मांडल्या. तसेच काजू खरेदी विक्री हंगामात बँकेत जास्त रोकड उपलब्ध करून देणे आणि एक अतिरिक्त कॅशिअर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.  

शैक्षणिक कर्ज देताना पालकांची आर्थिक परिस्थिती न पाहता विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व गरज विचारात घेऊन कर्ज द्यावे, अशी सूचना शलाखा येडवे, वर्षा नाटेकर, सुप्रिया बहिरे, रुपाली पेडणेकर यांनी केली. महिलांना व्यवसायासाठी कर्ज सुलभ व जलद मिळण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याची मागणी महिला उद्योजक शुभदा मयेकर यांनी केली. 
  व्यवस्थापक घरंडे यांनी बँक ऑफ इंडियाचा ग्राहकच केंद्रबिंदू असून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. व्यापारी व नागरिक यांनी आपले रोजचे व्यवहार रोखीने न करता बँकेमार्फत करण्याचे आवाहन त्यांनी केले. या चर्चेत बँकेचे अधिकारी अनिल बिरणगळ, सुधीर न्हावी, श्रीकांत कोगुरवार यांनी सहभाग घेतला.  बँक कर्मचारी आनंद सावंत आणि बाळकृष्ण राऊळ यांच्या चांगल्या सेवेबद्दल अभिनंदनाचा ठराव  ग्रामस्थांच्यावतीने घेण्यात आला.

  काका  धारगळकर, साईराज साळगांवकर, प्रवीण नाटेकर, दिवाकर नाटेकर, सूर्यकांत नार्वेकर, विजयानंद कासार, साई तेली, सुनील येडवे, मुक्तार शेख, दाऊद आगा, महंमद आगा, भैया गोवेकर, दिनेश देसाई आदिंसह व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते.  प्रास्ताविक सचिन नाटेकर यांनी केले. आभार राकेश केसरकर यांनी मानले.