Sat, Aug 24, 2019 09:46होमपेज › Konkan › महापुरुषांबाबत स्मारकांच्या नुसत्याच घोषणा

महापुरुषांबाबत स्मारकांच्या नुसत्याच घोषणा

Published On: Jan 24 2019 1:29AM | Last Updated: Jan 23 2019 11:20PM
खेड : प्रतिनिधी

महापुरुषांच्या स्मारकाच्या नावावर घोषणा झाल्या. परंतु, एकही स्मारक पूर्ण झाले नाही. जनतेला फसविण्याचे काम राज्यातील व केंद्रामधील सरकारने केले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी (दि. 23) भरणे येथे जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित कॉर्नर सभेत केली.

मुंबई-गोवा महामार्गावरून भरणे नाका येथे सकाळी 10.30 वा. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे आगमन झाले. यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्व नेत्यांचे स्वागत व सत्कार केला.

या यात्रेत माजी मंत्री आ. नसीम खान, खा. हुसेन दलवाई, आ. भाई जगताप, जिल्हा प्रभारी विश्‍वनाथ पाटील, खा. हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष रमेश कदम आदींसह जिल्हा काँग्रेसमधील प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष गौस खतीब, शहराध्यक्ष विजय जैन, अनिल सदरे, नासीर बडे, सैफ चौगुले, गणेश घोले, कादीर गजाली, इम्रान परकार, जावेद तांबे, आदम जसनाईक आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी जनसंघर्ष यात्रेचे स्वागत केले.

यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, यापूर्वी कोकणामध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली असली तरी राज्यात व केंद्रात सध्या अस्तित्वात असलेले सरकार जनतेला नको आहे. राज्यातील आघाडी सरकारचा कार्यकाळ व युती सरकारचा कार्यकाळ याच्यामध्ये जनता तुलना करीत आहे. त्यामध्ये आघाडीच्या कार्यकाळास जनतेकडून पसंती मिळत असल्याने कार्यकर्त्यांनी देखील युतीतील सेना-भाजपला कुठेही बळ मिळणार नाही याची खबरदारी स्थानिक पातळीपासून घेणे गरजेचे आहे. यापूर्वी स्थानिक पातळीवर ज्या काही घडामोडी झाल्या असतील त्या आता विसरून केवळ समविचार पक्षाबरोबरच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाणे गरजेचे आहे. काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर जर कोणत्या गोष्टी घडल्या असतील तर त्यावर प्रदेशकडून निश्‍चित कारवाई केली जाईल. स्थानिक पातळीवरील जे काही वादविवाद असतील ते पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टाळून काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन शिवसेना, भाजपला वेगळे करा. कोकणात काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडणुकीत कशा येतील यासाठी जिल्हा नेतृत्वाला प्रत्येक तालुक्यातून बळ द्यावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.