Fri, Feb 22, 2019 14:06होमपेज › Konkan › जादा कामाने परवाना अधिकारी हैराण

जादा कामाने परवाना अधिकारी हैराण

Published On: Oct 12 2018 1:03AM | Last Updated: Oct 12 2018 1:03AMरत्नागिरी : प्रतिनिधी

मत्स्य विभागात मासेमारी परवान्यासह दंडात्मक कारवाईपर्यंत सर्व जबाबदारी पार पाडणार्‍या परवाना अधिकार्‍यांची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वानवा आहे. पाच जागा असतानाही अवघा एकच परवाना अधिकारी कार्यरत असून त्यालाही लिपिकापासून शिपायापर्यंतची सर्व कामे करावी लागत आहेत. चार ठिकाणी प्रभारी अधिकार्‍यांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. मत्स्य विभागात अनेक जागा रिक्त असल्याने त्याचा फटकाही कामकाजावर होत आहे.

जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागामध्ये नाटे, रत्नागिरी, गुहागर, दापोली या ठिकाणी परवाना अधिकार्‍यांची नियुक्ती आहे. त्यातही नाटे येथेच परवाना अधिकारी असून उर्वरित चार ठिकाणी पदे रिक्त असून या ठिकाणी कार्यालयातील क्लार्कवरच परवाना अधिकारी म्हणून जबाबदारी टाकण्यात आली आहे. 

रत्नागिरी येथे मिरकरवाडा हे मुख्य बंदर असून त्याला लागूनच राजिवडा, कर्ला, साखरतर, पावस, पूर्णगड, वरवडे, जयगड हे छोटी-मोठी बंदरे आहेत. परंतु, मुख्य कार्यालयामध्येच परवाना अधिकार्‍यांची नियुक्ती शासनाने केलेली नाही. त्यामुळे येथील महिला कर्मचारी परवाना अधिकार्‍यांची जबाबदारी पार पाडत आहेत.

परवाना अधिकार्‍यांना नौकेला परवाना देण्यापासून, परवाना नूतनीकरण, त्याची तपासणी, नवीन नौकांचे प्रस्ताव, बंदरांमध्ये येणार्‍या नौकांची तपासणी,  नौकांवरील खलाशांची तपासणी, अवैध मासेमारीला लगाम घालण्याची जबाबदारी, अशा नौकांवर कारवाई, दंडात्मक कारवाई केल्यावर दंड वसुली, त्याचा ट्रेझरीमध्ये भरणा, बंदरांना भेटी आदी कामे एकाच कर्मचार्‍याला करावी लागत आहेत. ही सर्व कामे परवाना अधिकार्‍याला करावी लागत असल्याने त्यांच्या नाकीनऊ येत आहेत.