Wed, Oct 16, 2019 10:17होमपेज › Konkan › जिल्ह्यात 8 हजार वनराई बंधारे बांधणार

जिल्ह्यात 8 हजार वनराई बंधारे बांधणार

Published On: Nov 08 2018 1:26AM | Last Updated: Nov 08 2018 1:26AMरत्नागिरी : प्रतिनिधी              

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात सुमारे 8 हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 431 बंधारे लोकसहभागातून पूर्ण झाले असल्याचे कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी सांगितले.  

यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी हाती घेतली आहे. मार्च-एप्रिलमध्ये जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याच्या स्त्रोतांवर परिणाम जाणवू लागतो. पाण्याचे स्रोत आटून गेल्यामुळे अतिदुर्गम भागात वसलेली गावे व तेथील वाड्यांना या पाणीटंचाईची मोठी झळ लागते. जिल्ह्यात 845 ग्रामपंचायतींना लोकसहभागातून प्रत्येकी 10 बंधार्‍यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यातून जिल्हाभरात 8 हजार बंधार्‍यांची उभारणी करण्यात येणार आहे. 

वनराई बंधारे बांधले असता गावाची पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीसाठी सिंचनाची गरज काही प्रमाणात भागते. वनराई बंधारे बांधण्यासाठी कोणत्याही मोठ्या पूर्वतयारीची आवश्यकता नाही. फारश्या नियोजनाची आवश्यकता नाही. आणि तांत्रिक ज्ञान असणार्‍या अभियंत्याच्या मदतीशिवायच कोणत्याही गावातले गावकरी शेतकरी वनराई बंधारे बांधू शकतात. या  बंधार्‍यांना खर्च ही फार कमी येतो, असेही आरिफ शहा यांनी सांगितले.