Sat, Jul 04, 2020 10:50होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात उद्यापासून 7 दिवस लॉकडाऊन

सिंधुदुर्गात उद्यापासून 7 दिवस लॉकडाऊन

Last Updated: Jun 30 2020 11:31PM
सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्‍तीकडे वाटचाल करीत असतानाच जिल्ह्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ही गंभीर बाब असून अनलॉक-1 मध्ये याबाबतचे जनतेत गांभीर्य राहिलेले दिसत नाही. ही स्थिती अशीच राहिल्यास जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोनाची ही साखळी तोडणे आवश्यक आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 जुलै ते 8 जुलै या कालावधीत लॉकडाऊन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. या कालावधीत मार्च, एप्रिल महिन्यातील लॉकडाऊन प्रमाणेच केवळ जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा व आस्थापना सुरू राहणार आहेत. सायंकाळी 5 ते सकाळी 9 वा.च्या कालावधीत जिल्ह्यात संचारबंदी असणार आहे. विनाकारण फिरणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी  स्पष्ट केले आहे.

कोरोना पार्श्‍वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषद घेत माहीती दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिफे, डॉ.कांबळे उपस्थित होते. 

के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, जिल्ह्यात येणार्‍या चाकरमान्यांचे येण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. दिवसागणिक सुमारे एक ते दीड हजार चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत आहेत. ही संख्याही थांबवायची आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात कोरोनाची लागण आता स्थानिक नागरिकांमध्येही दिसू लागली आहे. ही जरी सामाजिक लागण नसली तरीही ही चेन रोखणे आवश्यक आहे. यासाठी लॉकडाऊन गरजेचे आहे. या लॉकडाऊन कालावधीत पुर्वीप्रमाणेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत सुरु राहतील. यात किराणा दुकाने, भाजी, दूध, तसेच चिकन शॉप, मच्छी आदींचा समावेश असणार आहे. तसेच शेतीची कामे, दवाखाने, औषध दुकाने आदी जीवनावश्यक बाबी लॉकडाऊन मधून वगळण्यात आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ 10 टक्के  कर्मचारी उपस्थिती

फळे,भाजी, दुध, मासे, औषधे, किराणा आदी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सध्या दुकाने किंवा बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी थांबवावी, या हेतूने हे लॉकडाऊन करण्यात येत आहे. कृषी विषयक कामे व सेवाही सुरु राहणार आहे. सरकारी, निमसरकारी कार्यालये दहा टक्के कर्मचारी घेऊन काम करणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेतील सरकारी, निमसरकारी विभाग पुर्णपणे सुरु असतील. तसेच त्यांना प्रवास करण्यासाठी स्वःताचे वाहन वापरता येणार आहे. मात्र संबंधितांचा पास सोबत असणे बंधनकारक आहे. बाहेरुन येणार्‍या लोकांचे होम कोरंटाईनही कडक राहणार आहे. त्याची नविन नियमावली लवकरच जाहीर केली जाईल, असेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.