Sat, Jul 04, 2020 20:42होमपेज › Konkan › आष्टी शिवारातील घरातून 1 लाख 14 हजारांचे दागिने लंपास

आष्टी शिवारातील घरातून 1 लाख 14 हजारांचे दागिने लंपास

Last Updated: Nov 09 2019 2:04AM
मोहोळ ः तालुका प्रतिनिधी

अज्ञात चोरट्यांनी घरातील डब्यात ठेवलेले 1 लाख 14 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी मोहोळ तालुक्यातील आष्टी गावच्या शिवारात घडली. याप्रकरणी 7 नोव्हेंबर रोजी मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मोहोळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी, ता. मोहोळ येथील दत्तात्रय विश्‍वनाथ चव्हाण आणि नवनाथ विश्‍वनाथ चव्हाण हे दोघे भाऊ पुणे येथील खासगी कंपनीत नोकरी करतात. कंपनीने दिवाळीची सुट्टी न दिल्याने ते 5 नोव्हेंबर रोजी आष्टी येथे आले होते.

त्याच दरम्यान दत्तात्रय चव्हाण यांच्या मामाच्या चुलत भावाचा मुलगा महादेव पांडुरंग ढवण व त्याची पत्नी गौरी महादेव ढवण हे त्यांच्या घरी आले होते. घरी पाहुणे आल्याने दत्तात्रयांच्या आईने दिवाळीचा फराळ बनविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांनी गळ्यातील गंठण, लक्ष्मीहार, कर्णफुले, झुबे त्यास वेल व कुंडल हे सोन्याचे दागिने एका डब्यात ठेवून तो डबा रॅकवर ठेवला होता.

फरळाचे बनविण्याचे काम रात्री सात वाजता पूर्ण झाले. त्यानंतर जेवणखाण करून सर्वजण रात्री दहा वाजता झोपले होते. दुसर्‍या दिवशी दुपारी साडेतीन वाजता पाहुणे महादेव ढवण आणि गौरी ढवण हे सुस्ते येथे जातो म्हणून घरातून निघून गेले होते. त्यानंतर रात्री अकरा वाजता दत्तात्रय यांच्या आईने रॅकवरील स्टीलचा ठेवलेला डबा घेवून पेटीमध्ये ठेवत असताना तिला त्यात ठेवलेले 1 लाख 14 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने दिसले नाहीत. सर्वत्र शोध घेतला असता ते मिळून न आल्याने दागिने चोरीस गेल्याची खात्री झाली.

याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा मोहोळ पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल गरड हे करीत आहेत. चोरीच्या या घटनेमुळे आष्टी परिसरात खळबळ उडाली आहे.