Mon, Sep 16, 2019 12:11



होमपेज › Konkan › ‘स्वाभिमान’च्या दणक्याने कर्नाटकी पोलिसांचा ‘डाव’ फसला!

‘स्वाभिमान’च्या दणक्याने कर्नाटकी पोलिसांचा ‘डाव’ फसला!

Published On: Oct 02 2018 1:17AM | Last Updated: Oct 01 2018 10:12PM



कुडाळ ः प्रतिनिधी

कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे येथील तुकाराम चव्हाण या युवकाने कर्नाटकी युवतीशी रितसर लग्न करून विशेष म्हणजे लग्नाची माहिती लेखी स्वरूपात कुडाळ पोलिस स्थानकात देवूनसुध्दा कुडाळ पोलिसांनी कर्नाटकी पोलिसांना साथ दिली. मात्र कुडाळमधील स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ धाव घेऊन दणका दिल्यामुळे या नवदाम्पत्याला कर्नाटक पोलिस कर्नाटकात घेऊन जावू शकले नाहीत. या सतर्कतेमुळे कर्नाटक पोलिसांचा डाव उधळला आणि कुडाळ पोलिसांचे मात्र नाक कापले गेले. आता कुडाळ पोलिस भाषेमुळे गोंधळ निर्माण झाल्याचे कारण सांगत आहेत. यात नवदाम्पत्य चव्हाण कुटुंबियांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. 
कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे (खरूडेवाडी) येथील चंद्रकांत चव्हाण यांचे छोटेसे कुटुंब आहे. दोन मुलगे व तीन विवाहित मुली असे कुटुंब असून तुकाराम या एका मुलाचे लग्न होणे बाकी होते. त्याच वाडीत कर्नाटक येथील एक युवती आपल्या मावशीकडे येवून राहिली होती. त्या युवतीशी तुकाराम याची ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्या दोघांनी लग्नाचा विचार केला. रितसर लग्न करण्यासाठी त्या युवतीने तुकाराम यांच्या वडिलांनाच थेट विनंती करत ‘मला तुमच्या मुलासोबत नुसते प्रेम नाही तर लग्नच करायचे आहे. तुम्ही होकार द्या’, अशी विनंती केली. अखेर वडील चंद्रकांत चव्हाण यांनी त्या मुलीला लग्नाकरिता होकार देताच रितसर तुकारामचे त्या कर्नाटकी युवतीशी लग्न झाले. मात्र त्या लग्नाला कर्नाटकी युवतीच्या बाजूकडून कोणीही व्यक्ती आल्या नव्हत्या. पुढे काही विघ्न येवू नये म्हणून चव्हाण कुटुंबियांनी लग्नानंतर कुडाळ पोलिसांना या लग्नाची रितसर लेखी कल्पना दिली होती. आपल्या शेवटच्या मुलाचे लग्न झाल्याने वयोवृध्द चंद्रकांत चव्हाण काहीसे निश्‍चिंत झाले होते. दुसरीकडे नवदाम्पत्य सुखी-संसाराची स्वप्ने रंगवत होते.

मात्र, शनिवार 29 सप्टेंबर रोजी सायं 6.30 वा. 2 कर्नाटकी पोलिस, 1 कुडाळ पोलिस व त्या नवविवाहितेचा एक नातेवाईक असे एकूण चौघे चव्हाण यांच्या तेर्सेबांबर्डे-खरूडेवाडी येथील घरी दाखल झाले. नवविवाहितेच्या वडिलांची मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद असून नवदाम्पत्याला कुडाळ पोलिस स्थानकात जबाब देण्यासाठी यावे लागेल, असे कर्नाटकी पोलिस सांगू लागले. यावेळी 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नवविवाहितेने आपण स्वखुशीने रितसर लग्न केले असून या लग्नाची माहिती कुडाळ पोलिस स्थानकात दिली आहे. तसेच लग्न केल्यानंतर आई-वडिलांनाही कल्पना दिली, असे सांंगितले. मात्र कर्नाटकी पोलिसांनी अधिकच दबाव टाकल्याने ते नवदाम्पत्य कुडाळ पोलिस स्थानकात जाण्यासाठी पोलिसांच्या गाडीत बसून मार्गस्थ झाले.  या सार्‍या प्रकाराने चव्हाण कुटुंबामधील तुकारामचे वडील, आई, वहिनी, भाऊ गर्भगळीत झाले. काय करावे ते त्यांना सुचेनासे झाले. त्याही स्थितीत नवरदेवाच्या वहिनी सैरभैर होत आपल्या घराकडून ग्रामपंचायतीकडे मुख्य रस्त्यावर आल्या आणि ही माहिती तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतीजवळ असलेल्या स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी रूपेश कानडे, रूपेश बिडये यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांना दिली. त्यानंतर स्वाभिमानच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तात्काळ कुडाळ पोलिस स्थानक गाठले. यावेळी कर्नाटकी पोलिसांनी आपले सोपस्कार पूर्ण करून त्या नवदाम्पत्याला कर्नाटकात नेण्यासाठी जात असतानाच नवविवाहितेच्या जाऊ सौ. रेश्मा चव्हाण यांनी त्या पोलिसांना रोखले असता कर्नाटकी पोलिसांनी मोठी रक्कम घेवून कर्नाटकात या,साहेबांना खूश करायचे आहे असे ते पोलिस बोलल्याचे सांगितले. ही माहिती स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकार्‍यांना समजताच याकडे कुडाळ पोलिसांचे त्यांनी लक्ष वेधले. स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी कर्नाटकी पोलिसांची गाडी अडविण्यासाठी फिल्डींग लावली. 

या सर्व घडामोडीत कर्नाटकी पोलिसांना साथ देवून आपलीच काहीतरी चूक झाल्याचे कुडाळ पोलिसांना लक्षात येताच कुडाळ पोलिसांनी तात्काळ आपली यंत्रणा वापरून कर्नाटकी पोलिसांना सावंतवाडी पोलिस स्टेशनला जाण्याबाबत सूचना केली. अखेर कर्नाटक पोलिसांनी आपली गाडी सावंतवाडी पोलिस स्थानकात वळविली. मात्र ही सर्व घटना कुडाळ हद्दीतील असल्याने सावंतवाडी पोलिसांनी कर्नाटकी पोलिसांना कुडाळ पोलिस स्थानकात त्या नवदाम्पत्यासह पाठवून दिले. अखेर कागदी सोपस्कार पूर्ण करत त्या चव्हाण नवदाम्पत्याला नातेवाईक व स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या स्वाधीन केले. या संपूर्ण घटनेत कुडाळ पोलिसांचा बेजबाबदारपणा दिसून आला. दुसरे म्हणजे रितसर लग्न करून त्या लग्नाची पोलिस स्थानकात माहिती देवूनसुध्दा कर्नाटकमधून बेपत्ता मुलीची चौकशी करण्यासाठी आलेल्या त्या कर्नाटकी पोलिसांना कुडाळ पोलिसांनी साथ का दिली? हे प्रश्‍न मात्र अनुत्तरित राहिले. मात्र या अनुत्तरित प्रश्‍नाने कुडाळ पोलिसांचे नाक कापले हे मात्र खरे. दुसरीकडे कुडाळ स्वाभिमान पदाधिकार्‍यांनी आपली ताकद दाखवून दिल्यानेच चव्हाण कुटुंबियांना दिलासा मिळाला, अन्यथा कुडाळ पोलिसांच्या बेजबाबदारपणाचा नाहक त्रास सर्वाधिक चव्हाण नवदाम्पत्यासह कुटुंबियांनाच अधिक होणार होता. 

कर्नाटक पोलिसांच्या भाषेची अडचण

तेर्सेबांबर्डे येथील नवदाम्पत्याला कर्नाटक पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेत कुडाळ पोलिस स्थानकात रितसर नोंद करून ते कर्नाटकमध्ये जाण्यासाठी मार्गस्थ झाले. मात्र त्या युवतीच्या विवाहाची माहिती यापूर्वीच कुडाळ पोलिस स्थानकात देण्यात आल्याचे समजताच आम्हीच सावंतवाडी व आंबोली पोलिसांना कल्पना देत कर्नाटक पासिंगची गाडी आल्यास  थांबवा अशा सूचना दिल्या होत्या. तत्पूर्वीच त्या कर्नाटक पोलिसांशी आमचा संपर्क झाल्याने त्या पोलिसांनी सावंतवाडी पोलिस स्थानकात आपली गाडी वळवली. त्यानंतर ते कुडाळमध्ये आले व नवदाम्पत्याला त्या पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक जगदीश काकडे यांनी देत भाषेच्या अडचणीमुळे आमच्या पोलिसांचा काहीसा गोंधळ झाला असल्याचे सांगितले.