होमपेज › Kolhapur › ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं...’

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं...’

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 14 2018 11:38PMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’ असे प्रेमगीत गात अनेकांनी बुधवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ चा मुहूर्त साधत आपल्या प्रेमाचा इजहार व्यक्त केला. काही तरुणांनी चोरी-चोरी तर कोणी प्रेयसीला गुलाब फुल देऊन हा दिवस उत्साहात साजरा केला. यादिवशी कॉलेज परिसरात तरुणाईचा उत्साह कायम राहिला. तसेच कॉफी हाऊस, हॉटेल्स, रेस्टॉरंट गर्दीने फुलून गेले.

बुधवारी सर्वत्र ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात प्रेमाचा दिवस उत्साहात साजरा झाला. प्रेमाचा हा एकदिवसीय उत्सव आता आठवडाभर साजरा होऊ लागला आहे. रोझ डेपासूनच व्हॅलेंटाईन डे सप्ताह सुरू झाला. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी बाजारात विविधरंगी गुलाबांची आवक वाढली आहे. गुलाब खरेदीसाठी बुधवारी फुल मार्केटमध्ये तरुणाईची लगबग सुरू होती. राजारामपुरी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क येथील भेटवस्तूंच्या दुकानात खरेदीसाठी प्रेमवेडे रमलेले होते. शहरातील हॉटेल्स, रेस्टारंट आणि मॉल्स दिवसभर हाऊसफुल होते. कपड्यांची दुकानेही लाल रंगांनी सजली होती. विशेष म्हणजे लाल रंगाच्या साड्या, ड्रेसेस, शर्ट, टी शर्ट पाहायला मिळाले. महाविद्यालयांमध्ये तरुण-तरुणींनी एकमेकांना शुभेच्छा देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा केला. तरुणाईसह पती-पत्नींनी, आबालवृद्धांनी देखील हा दिवस साजरा केला. व्हॅलेंटाईन सेलिब्रेशन करण्यासाठी अनेकांनी आधीच निसर्गरम्यस्थळी जाण्याचे नियोजन केले होते. कॉलेज फे्रंडस्, ऑफिस कलिगज्, फॅमिलींनी वन डे टूरवर जाणे पसंत केले. व्हॅलेंटाईन सप्ताहनिमित्त ठिकठिकाणी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पोलिस बंदोबस्त...
‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी महाविद्यालय परिसर तसेच ठिकठिकाणी निर्भया पथकासह साध्या वेशातील पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते. वेगाने मोटारसायकल नेणे, स्टंटबाजी करणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, अशा टवाळखोर तरुणांवर देखील पोलिसांचे विशेष लक्ष होते.

सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव
सोशल मीडियावर देखील दिवसभर प्रेमाचा वर्षाव झाला. ‘प्राण माझा असला तरी, श्‍वास मात्र तुझाच आहे, प्रेम माझे असले तरी, सुगंध मात्र तुझाच आहे, मी वेडा असलो तरी, वेड मात्र तुझेच आहे’, असे प्रेम व्यक्त करणारे मेसेज फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप, ट्विटरवर फिरत होते. अनेकांचे मेसेज बॉक्स प्रेम संदेशांनी हाऊसफुल्ल झाले. ‘व्हॅलेंटाईन’साठी मोबाईल कंपन्यांनी खास अ‍ॅपची निर्मिती केली आहे. याला तरुणाईची पसंती मिळत असून अनेकांनी या अ‍ॅपद्वारे आपल्या प्रेम भावना व्यक्त केल्या.