होमपेज › Kolhapur › ‘पॅसेंजर’ऐवजी लवकरच धावणार ‘डेमू’

‘पॅसेंजर’ऐवजी लवकरच धावणार ‘डेमू’

Published On: Apr 05 2018 2:13AM | Last Updated: Apr 05 2018 3:03PMकोल्हापूर : अनिल देशमुख

कोल्हापूर-मिरजसह अन्य मार्गावर लवकरच ‘पॅसेंजर’ऐवजी ‘डेमू’ धावणार आहे. बुधवारी या रेल्वेगाडीची कोल्हापूर-सातारा मार्गावर चाचणी घेण्यात आली. ही गाडी नियमित सुरू झाल्यास, प्रवासी संख्या वाढण्याबरोबरच सुखकर प्रवास होणार आहे.

कोल्हापूर-मिरज या मार्गावर दररोज पाच ‘पॅसेंजर’ धावतात. या गाडीतून दररोज 20 ते 25 हजार प्रवासी प्रवास करत असतात. नोकरी, व्यवसाय, व्यापार, शिक्षण आदींसाठी नियमित प्रवास करणार्‍यांची संख्या अधिक आहे. यामुळे प्रत्येक गाडीला प्रचंड गर्दी असते, त्यामुळे अक्षरश: जीवघेणा असा हा प्रवास असतो. या मार्गावर शटलसेवा सुरू करावी, अशी सातत्याने मागणी होती.

या सर्व पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर-मिरज-सातारा-पुणे, मिरज-कुर्डुवाडी, मिरज-लोंढा आदी मार्गावर धावणार्‍या ‘पॅसेंजर’ऐवजी ‘डेमू’ चालवण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. याकरिता या मार्गावर ‘डेमू’ रेल्वेगाड्यांची चाचणी घेण्यात येत आहे. बुधवारी दुपारी मिरज-कोल्हापूर ही पॅसेंजर म्हणून  ‘डेमू’ गाडी कोल्हापूर स्थानकात दाखल झाली. यानंतर ती दुपारी 4.50 वाजता कोल्हापूर-सातारा पॅसेंजर म्हणून रवाना झाली. अशा चार गाड्या मिरज सेक्शनमध्ये दाखल झाल्याचे सांगण्यात आले.

मिरज-कोल्हापूर आणि कोल्हापूर-सातारा मार्गावर या ‘डेमू’ची आज चाचणी घेण्यात आली असली तरी आणखी काही दिवस या गाड्या धावण्याची शक्यता आहे. यानंतर त्या नियमित होतील, असेही सांगण्यात येते. या मार्गावर ‘पॅसेंजर’ऐवजी ‘डेमू’ धावू लागल्या, तर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

‘डेमू’ म्हणजे ‘लोकल’
‘डेमू’ म्हणजे डिझेल इंजिनवर चालणारी ‘लोकल’ आहे. ‘डेमू’ गाडीला दोन्ही बाजूला इंजिन असते, पुढचा आणि मागचा डबा हा इंजिन असल्याने कोठेही इंजिन बदलण्याची गरज नसते. 12 डब्याच्या या गाडीला विक्रेत्यांसाठी वेगळा, महिलांसाठी वेगळे दोन डबे आहेत. या तीन डब्यांसह सर्वच डब्यात ये-जा करता येते. मुंबईत धावणार्‍या लोकलसारखी रचना आहे. प्रशस्त दरवाजे, प्रत्येक डब्यात प्रशस्त आसन व्यवस्था आणि खुली जागाही प्रशस्त आहे. उभे राहणार्‍या प्रवाशांसाठीही सुविधा असल्याने गर्दीतही सुलभ प्रवास करणे शक्य आहे. विशेष म्हणजे या गाडीतील प्रत्येक डब्यात पर्यावरणपूरक स्वच्छतागृह असल्याने प्रवाशांना त्याचा अधिक फायदा होणार आहे. पॅसेंजर गाडीत स्वच्छतागृहाची तसेच एका डब्यातून दुसरीकडे जाण्याची सोय नाही. आसनव्यवस्थाही फारशी चांगली नसल्याने या गाड्यांतून प्रवास म्हणजे ‘खुराड्यात’ बसल्यासारखीच प्रवाशांची अवस्था होत असते.